शिवसेनेची भाजपचे धोरण आणि जागावाटप याबद्दल तीव्र नाराजी
मुंबई: प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये, विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये परस्परांबद्दल धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीमध्ये अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपचे धोरण आणि जागावाटप याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुंबईमध्ये स्वबळावर सत्ता मिळवणे कोणत्याच पक्षाला शक्य नसल्यामुळे मुंबईत महायुती एकसंघ राहणे ही सगळ्यांचीच अगतिकता आहे. मात्र, ठाण्यापासून नंदुरबार पर्यंत सर्व ठिकाणी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार या सर्व ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांच्या विरोधात दंड थोपटत आहेत. भाजप व आपल्यावर अन्याय करीत असल्याची शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची भावना आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याची भाजपच्या स्थानिक नेत्यांची भाषा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या ठिकाणी आपले प्राबल्य दाखवण्यास उत्सुक आहे.
नाशिक, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आणि आमदार यांनी देखील भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून युतीधर्म पाळला जात नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी पक्ष दुर्बल करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहेत. पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना भाजपमध्ये घेऊन शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारीच उघडपणे भाजपचे काम करताना दिसून येत आहेत, अशा तक्रारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत व्यक्त केल्या.
