Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बोगस मतदारांची हकालपट्टी केल्याशिवाय राज्यात निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाहीत – संजय राऊत

मुंबई: प्रतिनिधी 

राज्याच्या निवडणुकी यादीत तब्बल 96 लाख ते एक कोटी बोगस मतदार असून त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय राज्यात निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाहीत, असा धावा करून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मतदार यादी दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक होऊ देणार नाही, असा इशारा आज पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आम्ही घुसखोरांना शोधून काढू, जे घुसखोर मतदार यादीत घुसले असतील त्यांना तिथून बाहेर काढू, अशी घोषणा केली आहे. या भूषणाचे आम्ही स्वागत करतो. गृहमंत्र्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या मतदार यादीतील एक कोटी घुसखोर बाहेर काढावे. ते मतदार यादीत असेपर्यंत निवडणुकांचा निकाल केवळ घुसखोरांच्या मर्जीवर अवलंबून असेल, असे राऊत म्हणाले. 

लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या कालावधीमध्ये राज्याच्या मतदार यादीत 50 लाख मतदार वाढले. विधानसभा निवडणुकीनंतर केवळ मुंबईमध्ये चार दिवसात सहा लाख मतदार वाढले. ही घुसखोरी भाजप आणि मिंधे गटाने घुसवले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे धारिष्ट गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवावे, असे आव्हान राऊत यांनी दिले. 

चोराच्या मनात चांदणे 

मतदार यादीतील घोटाळ्याबद्दल आम्ही राज्य निवडणूक आयोगाला सवाल करीत आहोत. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाला जाब विचारत आहेत. आम्हाला उत्तराची अपेक्षा देखील निवडणूक आयोगाकडून आहे. तरीही भाजप किंवा मिंधे गट त्याचा प्रतिवाद करायला का पुढे सरसावत आहेत, असा सवाल करून राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना, चोराच्या मनात चांदणे, खाई त्याला खवखवे, अशा म्हणी वापरून टोला लगावला. 

पन्नास रेड्यांचा बळी देऊन…

नरकासुराचा उगम गुवाहाटी येथील आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देखील गुवाहाटी येथे 50 रेड्यांचे बळी देऊन स्थापन झाले होते. ज्याप्रमाणे नरकासुराला चिरडले जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता गद्दारांना चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला विज्ञानाची वाट दाखवली. मात्र, सध्याचे पंतप्रधान आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे विज्ञान आणि तंत्रज्ञानापेक्षा तंत्र मंत्र आणि जादूटोणावर विश्वास ठेवणारे असून हे देशाला मागे लोटणारे आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. 

भारतात होईल अमेरिकेची पुनरावृत्ती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात अमेरिकेतील जनता रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. भारतात देखील अमेरिकेप्रमाणेच सुज्ञ जनता रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीच्या विरोधात आवाज उठवेल, असा दावाही राऊत यांनी केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading