Friday, September 18, 2026
Latest NewsPUNE

पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये ‘जिनॉमिक्स’चे अनन्यसाधारण महत्व – डॉ. शां. ब. मुजुमदार

पुणे : सध्या सुरु असणाऱ्या पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये जिनॉमिक्सला  अनन्यसाधारण महत्व राहणार असल्याचे मत सिंबायोसिसचे कुलपती पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी  व्यक्त केले. पुण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोगरोग, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते व इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे लिखित आणि रोहन प्रकाशन तर्फे प्रकाशित ‘जिनॉमिक्स- मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिस मधील विश्वभवन येथे नुकताच संपन्न झाला, या पुस्तक प्रकाशन समारंभा वेळी डॉ. मुजुमदार बोलत होते. रोहन प्रकाशन आणि अस्मिता फाउंडेशन यांच्यातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  डॉ. शां. ब. मुजुमदार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची उपस्थिती होती. याबरोबरच पुस्तकाचे लेखक डॉ. संजय गुप्ते व डॉ. अविनाश भोंडवे, रोहन प्रकाशनाचे संचालक रोहन चंपानेरकर, डॉ. अस्मिता गुप्ते आदी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

अलीकडच्या काळात जिनॉमिक्सचे महत्व वाढत चालले आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. जिनॉमिक्स व मानव यांचा जवळचा संबध आहे. जिनॉमिक्सच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होणे आता शक्य झाले आहे. मानवाला भविष्यात होणारे आजार, त्यावर नवीन औषधोपचार याचे संशोधन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे  पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये जिनॉमिक्सला  अनन्यसाधारण महत्व राहणार असल्याचे डॉ. मुजुमदार यावेळी म्हणाले.

विकसनशील भारत म्हणून देश पुढे जात असताना जिनॉमिक्स हा विषय प्रत्येकाला माहीत असणे अत्यंत महत्वाचे आहे. भविष्यकाळात या विषयाचे महत्व वाढेल यालाही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दुजोरा दिला.

जिनॉमिक्स हे शास्त्र वेगाने प्रगती करत आहे, असे सांगत डॉ. संजय गुप्ते म्हणाले की, “माणूस आणि चिम्पान्झी यांच्यामधील ९९ टक्के जीन्स सारखे आहेत. मांजर आणि माणूस यांच्यामध्ये ९० टक्के, माशीमध्ये ६५ टक्के, केळ्यामध्ये ६० टक्के जीन्स हे माणसाशी जुळतात त्यामुळे प्राणिशास्त्र व वनस्पती शास्त्र यांचे जवळचे नाते आहे. कालांतराने आपल्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे  हे जीन्सच्या माध्यमातून ठरवणे शक्य  होणार आहे. नोकरी करताना,  खेळाडू म्हणून करियर करताना या शास्त्राचा चांगला उपयोग होईल.”

आपण कुठला आहार घ्यावा ज्याने आपला खरा फायदा होईल, हे सुद्धा आपल्या जीन्स वर अवलंबून असते. तसेच आपण कुठला व्यायाम कुठल्या वेळेस केल्यास जास्त परिणामक होईल हे सुद्धा आता जेनेटिक टेस्ट करून ठरवता येते असेही डॉ. गुप्ते यांनी नमूद केले.

जिनॉमिक्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समजणे शक्य झाले असून हे शास्त्र एका फॅंटसीसारखे असल्याचे डॉ. अविनाश भोंडवे यावेळी म्हणाले. जिनॉमिक्सचा प्रसार भविष्यात वाढणार असल्याचे सांगताना या विषयावरील पुस्तक तयार करण्याची भूमिका रोहन चंपानेरकर यांनी यावेळी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading