फडके म्युझिक क्लासेस यांचा या वर्षीचा गुरुवंदन सोहळा संपन्न
पुणे : गायन, पेटी वादन आणि सतार वादन यांमध्ये मग्न झालेले विद्यार्थी आणि वातावरणात भरलेला उत्साह अशा प्रसन्न वातावरणात फडके म्युझिक क्लासेस यांचा गुरुवंदन सोहळा नुकताच संपन्न झाला.
कोथरूड येथील गांधीभवन येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध रंगमंचीय कार्यक्रमाचे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक अतुल अरुण दाते व जबलपूर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका अरुणा परांजपे, गुरु आलोक फडके व गुरुमाता प्रभा फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरु आलोक फडके यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विद्यार्थ्यांनी गायन, पेटी वादन व सतार वादन सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकल राग, सामुहिक रागमाला, यांचे सुंदर सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरु आलोक फडके यांनी संगीत दिलेले ‘शारदा स्तवन’ हे कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले. या गीताची शब्द रचना त्यांची शिष्या सायली सोनटक्के यांची होती. गायन, सतार वादन व पेटी वादनातील रागमालांना रसिकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.
गुरूंचे आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे किती बारकाव्याने लक्ष आहे हे या उत्तम सादरीकरणामधून दिसून येते असे गौरवोद्गार अतुल अरुण दाते यांनी काढले आणि गुरु शिष्य असे दोहोंचेही कौतुक केले. अरुणा परांजपे यांनी या प्रसंगी राग मधुवंती, ठुमरी व भैरवी सादर करीत कार्यक्रमाची सुरेल सांगता केली. त्यांना मनोज देशमुख यांनी तबला तर अभिजीत पाटसकर यांनी संवादिनी वर साथसंगत केली. या कार्यक्रमाचे नियोजन सायली सोनटक्के यांनी केले होते. तर दीप्ती जोग यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
