Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

शास्त्रोक्त आधार आणि शिल्पकारांचे कौशल्य यातून भारतीय स्त्रीदेवतांचे वैविध्य साकार

पुणे – मातृदेवतेपासून स्त्रीदेवतांचे अस्तित्व आढळते. काळानुरूप बदलत गेलेले मानवी मनाचे भाव, शिल्पकारांचे प्रगल्भ होत गेलेले कौशल्य आणि मूर्तींमागील शास्त्राचा तसेच पुराणकथांचा आधार, यातून भारतीय स्त्रीदेवतांच्या अंकनात विपुल वैविध्य आढळते, असे प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी येथे केले.

शारदीय नवरात्राचे औचित्य साधत पुण्यातील इंडी हेरीटेज व परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मास्टर क्लास’ उपक्रमांतर्गत  ‘स्त्रीदेवतांची रूपे’ विषयावर डाॅ. देगलूरकर यांनी विचार मांडले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील नवलमल फिरोदिया सभागृह येथे हा मास्टर क्लास संपन्न झाला. टीमवीच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत व भारतीय विद्या अध्यन केंद्राच्या प्रमुख डॉ. मंजिरी भालेराव व इंडी हेरीटेजचे समन्वयक तुषार जोशी यावेळी उपस्थित होते. संबंधित विषयात रुची असणाऱ्या पुणेकर नागरिकांची या मास्टर क्लासला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

देशातील प्राचीन मंदिरे व लेणी यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसणारे स्त्रीदेवतांचे अंकन, त्यांची वैशिट्ये व संबंधित भक्ती व सामाजिक परंपरा यावर डॉ. देगलूरकर यांनी प्रस्तुत व्याख्यानात प्रकाश टाकला.

“स्त्रीदेवतांचा आढळ इसवीसनपूर्व काळापासून आहे. अनेक उत्खननांत मातृदेवतांच्या रूपाने स्त्रीदेवता आढळल्या आहेत”, असे सांगून डाॅ. देगलूरकर म्हणाले, ‘तत्कालीन समजुतींनुसार स्त्रीचे मातृरूप या काळातील स्त्रीप्रतिमांमध्ये प्राधान्याने अंकित झाले आहे. पुढील काळात मात्र मानवी मनाने कल्पकता, प्रतिभेच्या आधारावर स्त्रीदेवतांच्या मूर्तींची निर्मिती शास्त्रोक्त, पुराणोक्त आणि सौदर्यशास्त्रीय निकषांनुसार केलेली आढळते. पुढे भक्तीची संकल्पना रुजल्यावर, स्त्रीप्रतिमांच्या मूर्तींमध्ये वैविध्य निर्माण झाले. विश्वाची निर्माणकर्ती, दुष्टांची संहारकर्ती आणि बुद्धीचे प्रतीक म्हणून स्त्रीदेवतांच्या मूर्ती विपुल संख्येने मंदिरे, लेणी यावर अंकित होऊ लागल्या”.

स्त्रीदेवतांमध्ये पार्वती या देवतेचे अंकन सर्वाधिक आढळते, असे निरीक्षण नोंदवून देगलूरकर पुढे म्हणाले, “मूर्ती सुरवातीला शब्दाकार होत्या. ऋग्वेदातील देवतावर्णने हे स्पष्ट करतात. मूर्तीला मानवी आकार नंतरच्या काळात मिळाला. शिवाय स्त्रीदेवतांच्या मूर्ती घडवताना, स्त्रीदेवतांचे कर्तृत्व बहुआयामी असल्याने पार्वतीची दुर्गा, उमा, महिषासुरमर्दिनी..अशी अनेकानेक रूपे शिल्पांकित झालेली दिसतात. त्या मूर्तींचे स्पष्टीकरण ग्रंथांमधून, पुराणांमधून आढळते. तिचे कार्य वेगवेगळे आहे. कधी ती आक्रमक, युद्धसन्मुख तर कधी ती पंचाग्नीसाधना करताना दिसते. सिंहारूढ रूपाने ती दुर्गा म्हणून आढळते. अर्धनारीश्वर या रूपाने ती जीवशिवाच्या ऐक्याचे प्रतीक बनते. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती ही तिचीच विविध रूपे आहेत. कल्याणकारी, दुष्टसंहार करणारी कालिका, चंडिका आणि बुद्धीमती सरस्वती..सर्व तिचीच रूपे आहेत”.

स्त्रीदेवतांचे असे अंकन मूर्तीशास्त्राच्या नियमांनुसार तर आहेच, पण मानवी मनाची संवेदनशीलता, हळुवारपणा आणि शिल्पकारांची प्रतिभा व कौशल्य, यातून भारतीय स्त्रीदेवतांच्या शिल्पांकनाला अपूर्ण असे वैभव प्राप्त झाले आहे, असे सांगून डाॅ. देगलूरकर यांनी स्त्रीदेवतांचे शक्तीरूप जिथे शिल्पांकित झाले आहे, अशा मातृदेवी, षष्ठी,  स्कंधा, विशाखा, सप्तमातृका, चामुंडा, वैनायकी, नारसिंही, व्यूहांतरा, हरिणी, गोमुखी, श्रीवत्सरूप लक्ष्मी, एकानंशा, नृत्यसरस्वती, तपस्विनी, कामदागौरी, ललितागौरी, क्षेमकरी, श्रावणी…अशा दुर्मिळ स्त्रीदेवतांची शिल्पे पारदर्शिकांच्या साह्याने दाखवून स्त्रीदेवतांच्या शिल्पांचे स्पष्टीकरण केले.

इंडी हेरीटेजचे समन्वयक तुषार जोशी यांनी प्रास्ताविकात इंडी हेरीटेजच्या माध्यमातून विविध दर्जेदार उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले. अनुश्री घिसाड यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading