… तरीही आम्ही एकत्रच राहू : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
शिंदे फडणवीस वादाबाबत दोन्ही बाजूंचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आमच्यामध्ये विस्तव घालण्याचे कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही एकत्रच राहू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शुक्रवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या अखत्यारीतील नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. केंद्र सरकारने पुरस्कृत केलेल्या अमृत योजनेसारख्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या केली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महायुती सरकारच्या स्थापनेपासूनच शिंदे नाराज असल्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत. मागील काही काळात त्याला आणखी वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची शिंदे यांच्या अनुपस्थितीत केलेली कानउघाडणी हा शिंदे आणि फडणवीस यांच्यातील कथित तणावाचा भाग मानला जात आहे.
याबद्दलचा खुलासा फडणवीस आणि शिंदे या दोघांकडूनही करण्यात आला आहे. आपल्यामध्ये पूर्ण सामंजस्य असून आपल्यात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आमच्या दोघांमध्ये कोणतेही वाद नसून महाराष्ट्राचा विकास या एकाच उद्देशाने आम्ही दोघेही काम करत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
