Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

तब्बल १०० वर्षाच्या काळानंतरही छत्रपती शिवरायांच्या तख्ताबद्दल लोकांमध्ये आदर

‘जोहार दिवटी मुजऱ्याचे समयी’ अशी नोंद सापडली   
इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ञ राज मेमाणे 
पुणे :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १०० वर्षानंतरही रायगडावर दररोज संध्याकाळी तख्ताच्या दोन्ही बाजूला दोन दिवे आणि दिवटी म्हणजेच मशाल लावून रीतसर मुजरा केला जात असे. याबाबत ‘जोहार दिवटी मुजऱ्याचे समयी’ अशी नोंद सापडते. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांचे निधन १६८० मध्ये झाले आणि या नोंदी १७७३ नंतरच्या १८ व्या शतकातील आहेत. तब्बल १०० वर्षाच्या काळानंतर देखील महाराजांबद्दल, त्यांच्या तख्ताबद्दल प्रचंड आदर लोकांमध्ये होता, अशी माहिती इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ञ राज मेमाणे यांनी सांगितली.
नो डॉक्युमेंट्स नो हिस्टरी आणि श्री मल्हार पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गराज रायगड एक नवा दृष्टिक्षेप या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिहासाचार्य वि.का  राजवाडे सभागृहात इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ञ राज मेमाणे यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमास संदीप पोतनीस, पुष्कर पेशवा, सिनेदिग्दर्शक तुषार शेलार, युवराज मेमाणे आदी मान्यवर आणि इतिहासप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज मेमाणे म्हणाले,  १८ व्या शतकातील रायगड किल्ला आणि शिवाजी महाराजाच्या काळातील किल्ला यामध्ये फरक आहे. किल्ल्याचे महत्व संपले नव्हते. ते केवळ लढण्याचे साधन नव्हते तर आर्थिक घडामोडींचे ठिकाण होते. रायगडावरील राजवाड्यातील आठ खोल्या, कैद्यांसाठी खोल्या, समुद्राच्या फेसाच्या दगडाचा वापर करून तयार केलेला सोपा, राजवाड्यातील हौद तसेच महाराजांच्या तख्ताची सदर, विवेकसभा, अशा अनेक इमारतींचे उल्लेख मोडी कागदपत्रांतून सापडतात, अशी माहिती ही त्यांनी थ्रीडी चित्रांच्या माध्यमातून दिली.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, राज मेमाणे यांनी पुणे पुरालेखागारातील मोडी कागदपत्रांवर आधारित लिहिलेल्या महाराजांचा रायगड या ग्रंथाची इतिहासातील एक उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून नोंद राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading