जिथे कमी तिथे समाज म्हणून आपण उभे रहावेप्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर
पुणे : करिअर करताना अनेक अडचणी येत असतात. मात्र, अशा वेळी जिथे कमी पडेल तिथे आपण समाज म्हणून उभे राहायला हवे. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे गरजूंना मदत द्यायला हवी. जेव्हा ते यशाचे शिखर पादाक्रांत करतील, तेव्हा नक्कीच आठवण ठेवतील, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ च्या वतीने एमपीएससी व यूपीएससी करणाऱ्या तीन दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट देण्यात आले. यावेळी माजी अप्पर पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र बलकवडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन होले, शिरीष मोहिते, शाबिर शेख, नलिनी दिघे, सदाशिव कुंदेन, सुभाष सरपाले, विनायक घाटे, पियुष शहा, प्रकाश ढमढेरे, अनेक मान्यवर व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. लॅपटॉप करीत साहाय्य करणारे सुनीता राचल्ला, हर्षल राचल्ला परिवार यांचा यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थीनी पूजा पाटील म्हणाली, कोल्हापूरवरून मी पुण्यात शिकण्यासाठी आले आहे. आम्हाला अत्यंत आवश्यकता असताना ही मौल्यवान भेट मिळाली आहे. याचा उपयोग करून यशस्वी होत, चांगल्या पदावर कार्य करीन असे तिने सांगितले.
साईगुरु सेवा संस्थेची विद्यार्थीनी गौरी देशमुख म्हणाली, स्वराज्याचे सुराज्य करणारी माणसे आजच्या काळात आहेत, याचा आम्हाला आनंद वाटतो. त्यांच्याकडूनच आम्हाला ही मदत मिळाली आहे. अंधाऱ्या जीवनात प्रकाशाची वाट यामुळे खुली झाली असून आम्ही प्रकाशदिवे घेऊन नक्कीच यशाला गवसणी घालू, असेही तिने सांगितले. दृष्टीहीन मुलींचा विवाह सोहळा, दृष्टीहीन मुलांची सहल आणि आता शैक्षणिक मदत असे उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे शिरीष मोहिते यांनी सांगितले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत मोहिते यांनी आभार मानले.
