Wednesday, May 20, 2026
Latest NewsPUNE

शिवसृष्टीतील जीवंतपणा, भव्यता हे परदेशातील संग्रहालयांच्या दर्जाचे – प्रवीण तरडे

पुणे : आपण परदेशातील पर्यटनस्थळे, संग्रहालये पहायला गेलो की तिथे त्यांनी त्यांच्या इतिहासाची केलेली मांडणी, भव्यता आणि स्वच्छता बघून हरखून जातो. आपल्या महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या पुण्यातील शिवसृष्टीमधील जिवंतपणा, भव्यता ही परदेशातील संग्रहालयांच्या दर्जाची असून आज छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यामागील दृष्टी अनुभविताना अंगावर काटा आला, अशा भावना सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या.

आज नागपंचमीच्या दिवशी पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची जयंती तिथीप्रमाणे शिवसृष्टीत साजरी करण्यात आली यावेळी प्रवीण तरडे यांनी शिवसृष्टीला भेट देत आपली कृतज्ञता व्यक्त केली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रवीण तरडे यांच्या पत्नी व अभिनेत्री स्नेहल तरडे, ढोले पाटील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील, त्यांच्या पत्नी उमा ढोले पाटील, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार, आंबेगावचे माजी सरपंच व माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, माजी उपसरपंच दिनेश कोंढरे, प्रतिष्ठानचे सल्लागार बिरू खोमणे, सामाजिक कार्यकर्ते गुणेश पुरंदरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

याप्रसंगी बोलताना तरडे पुढे म्हणाले की, “शिवसृष्टी उभी रहावी हे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते. आज हे स्वप्न याची देही याची डोळा अनुभविताना अंगावर काटा आला. अवघ्या २-३ तासांत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट दयायलाच हवी, असे मला वाटते. इथली सुंदरता लागलीच डोळ्यांत भरते. महाराजांना अपेक्षित असलेले स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा हे तत्त्व इथे येऊन समजून घेता आले आणि दर काही मिनिटांत डोळ्यांत पाणी येत राहिले. महाराजांनी जे किल्ले उभे करायला तहहयात घालविली ते किल्ले, त्यांचे महत्त्व, त्यावरील लढाया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाहता येतात.”

युरोप, दक्षिण कोरिया, जपान अशा परदेशातील ठिकाणी आपण गेलो की त्या लोकांनी त्यांच्या इतिहासाची केलेली मांडणी, सादरीकरण, जपलेली स्वच्छता पाहिली की आपण हरखून जातो. तोच जीवंतपणा, भव्यता आपण शिवसृष्टीत अनुभवितो असे सांगत येणाऱ्या नव्या पिढ्यांना शिवाजी महाराज जसे आहेत तसे दाखविण्याचे सामर्थ्य अत्याधुनिक पद्धतींच्या वापराने या शिवसृष्टीत उभे केले आहे, ते पहायला नागरीकांनी जरूर यावे असे आवाहन देखील तरडे यांनी केले.

आपण एखाद्याच्या वाढदिवसाला सहजच वेगवगेळ्या प्रकारच्या भेटी देत असतो, यापुढे आपण शिवसृष्टीचे तिकीट त्यांना देऊन आपला हा इतिहास घराघरांत पोहोचवूयात असेही तरडे यांनी नमूद केले. प्रत्यके मराठी व्यक्तीने आपले कुटुंब, आपला परिवार, आपले शेजारी, मित्र- मैत्रिणी अशा सर्वांना शिवसृष्टीला भेट देण्याचे आवाहन करावे असेही तरडे म्हणाले.

यावेळी प्रवीण तरडे आणि बाकी मान्यवरांनी शिवसृष्टीमधील गडकिल्ल्यांचा विभाग, महाराजांच्या स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसूत्रींची माहिती देणारे दालन, भवानी माता मंदिर यांना भेट दिली. आज तब्बल दोन हजार पर्यटकांनी शिवसृष्टीला भेट दिली यामध्ये परदेशी नागरिकांचा देखील सहभाग होता.

तिथीनुसार पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या असणाऱ्या जन्मदिनानिमित्त शिवसृष्टीत १० बाय ६ फूट इतकी भव्य रांगोळी देखील रेखाटण्यात आली होती. नीलम शिवतरे, पूनम पवार, नेहा दीक्षित, श्रीराम महामुनी व योगिता जाधव यांनी ही विशेष रांगोळी रेखाटली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading