संगीतातून उलगडले अध्यात्म
पुणे : अच्युतम केशवम कृष्णदामोदरम, रामनारायणम् जानकी वल्लभम् या श्लोकासह कृष्णलीलेची, कृष्णभक्तीची वर्णन करणारी असंख्य गाणी रविवारी सादर झाली आणि पुणेकर रसिकांनी भक्ती आणि संगीताचा एक अनोखा संगम अनुभवला. प्रसिद्ध गायक अमेय डबली यांनी आपल्या सादरीकरणातून कृष्णक्तीचा उत्तम नमुना सादर केला.
निमित्त होते, अमेय डबली यांच्यातर्फे आयोजित कृष्णा- म्युजिक, ब्लिस अँड बियॉँड या कार्यक्रमाचे. बाणेरच्या बंटारा भवन येथे रंगलेल्या कार्यक्रमाला पुणेकरांनी भरभरून दाद दिली.
दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात, अमेय डबलींनी श्रोतृवर्गासमोर अध्यात्माचे विविध पैलू उभे केले. डबली यांच्या या सादरीकरणाने रसिक तल्लीन होऊन गेले. कुणी ध्यानात मग्न, कुणी कृष्णनामात रंगलेले, तर कुणी नादब्रह्माच्या लयीत आनंदाने नाचताना पहायला मिळाले. या काही तासांमध्ये उपस्थितांनी संपूर्णपणे वर्तमानात जगत, तणाव बाजूला ठेवून शुद्ध आनंद अनुभवल्याचेही दिसून आले.
कार्यक्रमावर भाष्य करताना अमेय डबली यांनी सांगितले की, “धर्म आणि अध्यात्म यांचा नेहमीच गोंधळ होतो. हे एकमेकांसोबत चालू शकतात, पण ते समान नाहीत. धर्म आपल्याला आचारशुद्धी शिकवतो, तर अध्यात्म आपल्याला आत्मशुद्धीचा मार्ग दाखवते आणि याच्या मधोमध असतं संगीत ज्याला कुठलाही धर्म लागत नाही. संगीत थेट आत्म्याशी संवाद साधतं. ‘कृष्णा’ म्हणजे अशाच त्या संवादाची, त्या अनुभवाची, एक सजीव अभिव्यक्ती आहे. पुणेकरांनी ही ऊर्जा उरात सामावून घेतली, हे पाहून मन भरून आलं..”
