Thursday, September 17, 2026
Latest NewsPUNE

गुरुपौर्णिमा उत्सवात भगवतगीतेच्या १८ अध्यायांचे पठण

पुणे : श्रीमद्भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सुस्वर पठण, गीतेची आरती, गीता महात्म्य आणि मंत्र पठणाने संपूर्ण मंदिराचा परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२८ व्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित उत्सवात सामूहिक गीता पठणातून आध्यात्मिक वातवरणाची अनुभूती घेतली.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहात गीता धर्म मंडळाच्या वतीने समग्र गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिराच्या प्रांगणात श्री दत्त कला मंच येथे करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनिल रूकारी, राजेंद्र बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास करून त्यातून समग्र संत दर्शन साकारण्यात आले होते.

सकाळी इंदौर येथील अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या पुणे शाखेच्या वतीने तेजस तराणेकर यांच्या अधिपत्याखाली दत्त याग संपन्न झाला. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाईंच्या इच्छेनुसार दत्त मंदिरामध्ये दर एकादशीला सायंकाळी कीर्तन होत असते. आषाढी एकादशी निमित्त ह.भ.प. शिवार्चना ताई कुलकर्णी यांचे संत जनाबाईंच्या जीवन चरित्रावर कीर्तन झाले.

याच प्रसंगी उत्सवानिमित्त ‘नादब्रह्म गुरू तत्व रहस्य’ या विषयावर प्रवचनाचे देखील आयोजन करण्यात आले. यावेळी प्रवचनकार श्री गुरूदेव व्यासजी यांनी गुरू महात्म, गुरू संगती, परमात्म्याची ओळख, गुरूतत्व, नादब्रम्ह यावर मार्गदर्शन केले. कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे यांनी श्री गुरूदेव व्यासजी यांचा स्वागत व सन्मान केला.

श्री गुरूदेव व्यासजी म्हणाले, परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होईपर्यंत आपण मानवनिर्मित देवतांची पूजा करत असतो, परंतु गुरूच आपल्याला परब्रह्मतत्त्वाची अनुभूती देतो. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, पाप-पुण्याच्या चक्रातून मुक्त करणारा आणि अंतर्मनातील ब्रह्मतत्त्वाची ओळख करून देणारा गुरूच खऱ्या अर्थाने जीवनाचा दिशादर्शक असतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading