Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लघुउद्योग हा धारावीचा आत्मा असून तो कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास

मुंबई: प्रतिनिधी 

कुशल मनुष्यबळावर आधारित लघुउद्योग हा धारावीचा आत्मा असून तो कायम ठेऊनच धारावीचा पुनर्विकास करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ रज्याचाच नव्हे तर देशाचा आर्थिक नकाशा बदलून टाकणारा ठरणार आहे. या प्रकल्पात प्रत्येक धारावीकराचा समावेश झाला पाहिजे, याची जाणीव प्रशासनाला करून देण्यात आली आहे. या परिसराचा पुनर्विकास पर्यावरणस्नेही, सर्वसमावेशक आणि संवेदनशील पद्धतीने झाला पाहिजे, याचा कटाक्ष ठेवण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

कुशल मनुष्यबळावर आधारित लघुउद्योगांची अर्थव्यवस्था असलेला चेहेरा ही धारावीची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. लाखो कुशल कारागीर, लघुउद्योजक आणि वंचित घटकांचा धारावी हा प्राण आहे. हा धारावीचा आत्मा आहे. तो कायम राहिला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. 

या ठिकाणी असलेल्या व्यवसायाची पारंपारिक ओळख कायम राहावी, त्यांच्या मूळ जागेचा सन्मान ठेऊन त्यांचे पुनर्वसन व्हावे, त्यासाठी समन्वय आणि संवेदना याची सांगड घालून प्रकल्पात सहभागी असलेल्या प्रत्येकाला विश्वासात घेतले जावे, यासाठी काटेकोर सूचना दिल्या आहेत, असे सांगतानाच, धारावीचा मूळ आत्मा कायम ठेवून भविष्यातील नव्या शक्यता निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाचे काम अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading