शारीरिक शिक्षण व क्रीडा क्षेत्रात एआयमुळे होणारे परिवर्तन व संधी याविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोथरूड मधील मयूर कॉलनी येथील एमईएसच्या सभागृहात ही दोन दिवसीय परिषद संपन्न होणार असून ‘बीसी टू एडी’ अर्थात बिफोर चॅटजीपीटी टू एआय डिसरप्शन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीय मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, इंडियन सोसायटी ऑफ स्पोर्ट्स अँड एक्सरसाईज मेडिसिन इंडिया, फिट टू स्पोर्ट्स पुणे, इंटरनॅशनल फिजिकल लिटरसी असोसिएशन (आयपीएलए), अमेरिका यांचे विशेष सहकार्य परिषदेसाठी लाभले आहे.
सदर परिषद इच्छुकांसाठी सशुल्क असून स्पोर्ट्स सायन्स प्रोफेशनल्स, शारीरिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले, स्पोर्ट्स कोचेस, प्रीसर्व्हिस, इन सर्व्हिस प्रोफेशनल्स, शिक्षक, एज्युकेटर्स, खेळाडू, टेक्नॉलॉजी- इनोव्हेशन एक्सपर्ट्स, संगणक, आयटी, स्पोर्ट्स अभियंते, फिटनेसची आवड असणारे, हेल्थ- वेलनेस प्रोफेशनल्स, अॅडमिनिस्ट्रेटर्स असे सर्वजण परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतात.
या परिषदेविषयी अधिक माहिती देताना एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले म्हणाले, “चॅट जीपीटी सारख्या एआय-संचलित साधनांच्या उदयापूर्वी क्रीडा व शिक्षण या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा मर्यादित स्वरूपाचा होता व ही दोन्ही क्षेत्रे मोठ्या प्रमाणात पारंपारिक पद्धतींवर अवलंबून होती. मात्र, गेल्या काही वर्षात एआय, मशीन लर्निंग यांमुळे आपल्या क्रीडा आणि शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोनात क्रांती घडून आली आहे. वाढत्या कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे (एआय) ही क्षेत्रे परिवर्तनात्मक अशा मुलभूत बदलांना सामोरी जात आहेत ही विचार करण्यासारखी बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “आज पर्सन्लाईज्ड लर्निंग प्लॅटफॉर्म्स, अॅडॅपटिव्ह स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आणि प्रेडिक्टिव्ह अॅनॅलिटिक्स यांसारख्या एआयसंचालित नवकल्पना या मानवी नवकल्पनांची सीमा पुन्हा परिभाषित करत असताना एकीकडे प्रचंड संधी आहेत तर दुसरीकडे संभाव्य धोके देखील निर्माण होत आहेत. या धोक्यांमध्ये प्रामुख्याने नोकरी विस्थापन, भेदभाव यांसोबतच मानवी संवाद कमी होणे यांचा समावेश आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मार्गक्रमण करीत असताना एआय विकास हा जबाबदार कसा होऊ शकेल? त्यांमुळे मानवी क्षमतांमध्ये कशा पद्धतीने वाढ होऊ शकेल? आणि त्याचे नकारात्मक परिणाम कसे कमी होतील? या प्रश्नांकडे लक्ष देणे महत्त्वाचे असेल. हेच लक्षात घेत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.”
महाराष्ट्रीय मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई) हे शारीरिक शिक्षण क्षेत्रात आपल्या स्थापनेपासूनच उत्कृष्टतेचा समृद्ध असा वारसा जपत असून या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था म्हणून ते नावारूपास आले आहे. भारतात शारीरिक शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य याला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांच्या यादीत महाविद्यालयाचे नाव आघाडीवर आहे. नावीन्यपूर्णता, संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी दृढ वचनबद्धतेसह, संस्था देशातील शारीरिक शिक्षणाचे भविष्य घडवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे संस्थेने आयोजित केलेली ही आंतरराष्ट्रीय परिषद या विषयात एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले यांनी व्यक्त केला.
सदर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा भूतकाळ व वर्तमानकाळ, नवकल्पना आणि क्रीडा, फिटनेस, शारीरिक शिक्षण, शिक्षण या क्षेत्रातील नवकल्पनांवर उहापोहा होईल. क्रीडा, फिटनेस आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान, नवकल्पना, एआय कसे प्रभावीपणे काम करू शकतात, हे समजून घेण्यासाठी या सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करेल. याबरोबर या विषयीच्या कल्पना, बेस्ट प्रक्टिसेस यांवर चर्चा करणे, विचारांची देवाणघेवाण करणे, शिक्षण पद्धती, संशोधन यामधील क्षमता वाढविणे, आव्हाने व संधींवर चर्चा करून मार्ग काढणे आणि नजीकच्या भविष्यात यासाठी प्रयत्नशील राहणे या गोष्टींवर परिषदेदरम्यान कार्यशाळा संपन्न होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष व महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सीएसीपीई)चे प्राचार्य डॉ. सोपान कांगणे यांनी दिली.
सदर परिषदेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाचे कुलगुरू प्रो संजीव सोनावणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंटर डिसिप्लिनरी स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ संजय तांबट यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर हे समारोप प्रसंगी उपस्थित असतील.
तसेच महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) चे मुख्य मार्गदर्शक डॉ विवेक सावंत, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ भूषण केळकर, स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ प्रो. डॉबसन डॉमिनिक, फिट टू स्पोर्ट्सचे डॉ अजित मापारी, रिसर्च आणि पॉलिसी अॅनालिस्ट डॉ अजित कानिटकर, थिंक बँक सोल्युशन्सचे विनायक पाचलग, इंटरनॅशनल फिजिकल लिटरसी असोसिएशन (आयपीएलए)चे विश्वस्त डॉ अमित मलिक, स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ डॉ गगन बनोधे व डॉ आशीर्वाद जाधव, स्ट्रेन्थ व कंडिशनिंग कोच वरूण शेट्टी या महत्त्वाच्या वक्त्यांचा सहभाग परिषदेत असेल असे परिषदेच्या समन्वयिका डॉ श्रद्धा नाईक यांनी नमूद केले. परिषदे दरम्यान जरनल आणि पेपर प्रेसेंटेशन्स देखील होणार असल्याचे एमईएसच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर देसरडा यांनी नमूद केले. डॉ उमेश बिबवे हे परिषदेचे सहसमन्वयक म्हणून काम पाहतील.
