अभिजातता आणि व्यावसायिक यशाचा अनोखा समतोल म्हणजे स्टीव्हन स्पीलबर्ग यांचे चित्रपट
चित्रपट तज्ज्ञांनी व्यक्त केले मत
‘श्रीराम लागू रंग अवकाश’च्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम
पुणे : “चित्रपट या माध्यमावरील हुकमत, चित्रभाषेवरील प्रभुत्व यांच्या जोडीने अभिजातता आणि व्यावसायिक यशाचा समतोल स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या चित्रपटांतून दिसतो”, असे मत मान्यवर चित्रपटतज्ज्ञांनी मांडले. निमित्त होते, प्रायोगिक रंगभूमीचे अवकाश विस्तारणाऱ्या आणि रंगभूमीला नवा आयाम देणाऱ्या ‘श्रीराम लागू रंग अवकाश’ या प्रकल्पाच्या वर्षपूर्वीचे.
या उपक्रमाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेंटरच्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात आज झालेल्या या कार्यक्रमात ‘फिल्म स्टडी सेंटर’ या उपक्रमाअंतर्गत हाॅलिवुडचे गाजलेले दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांचे चित्रपट आणि त्यांची चित्रशैली, या विषयावर चर्चात्मक संवादाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट तज्ज्ञ सतीश जकातदार, सुहास किर्लोस्कर आणि दीपक देवधर यांनी यावेळी विचार मांडले. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला होता.
सुहास किर्लोस्कर यांनी स्पीलबर्ग यांच्या चित्रशैलीची वैशिष्ट्ये त्यांच्या चित्रपटांतील अनेक प्रसंगांच्या माध्यमातून उलगडली. “स्पीलबर्ग यांची चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत अनोखी होती. कथानकाचा वेग, कॅमेऱ्याचा वापर, कला दिग्दर्शनातील आणि निर्मिती आरेखनाचा सूक्ष्मातिसूक्ष्म विचार, चरित्रपट करताना इतिहासाशी ईमान राखून केलेली मांडणी, वैशिष्ट्यपूर्ण ओपनिंग सीन्स, कॅमेऱ्याचा कल्पक वापर, दृष्यचौकटीचे विलक्षण भान, पार्श्वसंगीताचे उत्कृष्ट योगदान, संकलनातील कौशल्य..अशा अनेक घटकांमधून स्पीलबर्ग यांच्या चित्रपटांचे वेगळेपण लक्षात येते. चित्रपट माध्यमावरील हुकमत आणि चित्रभाषेवरील विलक्षण प्रभुत्व, यांचा समतोल साधल्याने स्पीलबर्ग यांचे चित्रपट एकाचवेळी अभिजातता आणि लोकप्रियता यांचा समतोल साधणारे ठरले आहेत”, असे किर्लोस्कर म्हणाले.
दीपक देवधर यांनी स्पीलबर्ग यांच्या चित्रपट कारकिर्दीची सविस्तर माहिती आकडेवारीसह रसिकांसमोर ठेवली. “स्पीलबर्ग हे द्रष्टे आणि सर्व ठोकताळे तोडून नवी मांडणी करणारे दिग्दर्शक आहेत. तंत्रज्ञानाचा अतिशय नाविन्यपूर्ण वापर त्यांच्या सायन्स फिक्शन, फॅंटसी तसेच युद्धपटांमधून आढळतो”, असे देवधर म्हणाले. “स्पीलबर्ग यांनी तब्बल ४२ चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी लघुपट, माहितीपट, टिव्ही मालिका, म्यूझिक व्हिडिओ असे विविध माध्यमप्रकार हाताळले. त्यांच्या अपूर्ण प्रकल्पांची संख्या ९० आहे. स्पीलबर्ग यांना आजवर ३३८ वेळा नामांकने मिळाली असून, त्यापैकी ७३ वेळा ते पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. एकाच प्रकारचे चित्रपट न करता, त्यांनी जपलेले वैविध्य हेही त्यांचे वेगळेपण आहे. थरारपट, रहस्यपट, चरित्रपट, युद्धपट, विनोदपट, फॅन्टसी, सायन्स फिक्शन असे अनेक आकृतीबंध स्पीलबर्ग यांनी यशस्वीपणे हाताळले”, असेही देवधर यांनी स्पष्ट केले.
सतीश जकातदार म्हणाले, “१९७० ते ८० मधील अनेक प्रकारच्या स्थित्यंतराचे जग स्पीलबर्ग यांनी त्यांच्या जडणघडणीच्या काळात अनुभवले. सायन्स फिक्शनचे एक वेगळे दर्शन त्यांनी जाॅज, ज्यूरासिक पार्क आदी चित्रपटांतून घडवले. ते केवळ दिग्दर्शकच नाहीत तर पटकथाकार, संशोधक, कार्यकारी निर्माते, निर्माते अशा विविध भूमिका निभावत राहिले”.
सुरवातीला सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी श्रीराम लागू रंग अवकाश उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. चित्रपट, चित्रकला, छायाचित्रकला, नृत्य, संगीत, साहित्य, अभिवाचन, रंगभूमी, उपशास्त्रीय संगीत अशा विविध ललित कलांना सामावून घेणारे अनेक उपक्रम वर्षपूर्तीनिमित्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टीव्हन स्पीलबर्ग यांचा द ड्युएल हा चित्रपट यावेळी दाखवण्यात आला.
