Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

रंजनी आणि गायत्री या बहिणींच्या कर्नाटक शैलीतील गायनाने वसंतोत्सवच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात

 

पुणे : रंजनी आणि गायत्री या बहिणींच्या कर्नाटक शैलीतील बहारदार गायनाने आज १८ व्या वसंतोत्सवची सुमधुर सुरुवात झाली. रविवार दि. १९ जानेवारी पर्यंत कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे वसंतोत्सव संपन्न होत असून वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज महोत्सवासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, नेहा देशपांडे, दीप्ती माटे, सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक अतुलकुमार उपाध्ये, तेजस व राजस उपाध्ये आदी उपस्थित होते. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज महोत्सवाला भेट दिली.

कर्नाटक शैलीतील आपल्या सहगायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रंजनी आणि गायत्री या बहिणींनी राग कलावती प्रस्तुत करीत आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. या रागात आदितालामध्ये त्यांनी एक रचना सादर केली. यानंतर त्यांनी राग रंजनी गायला. यामध्ये या दोघींनी सद्गुरू त्यागराज स्वामी यांच्या समाधी दिवसानिमित्त रूपक तालातील एक रचना प्रस्तुत केली.

यानंतर त्यांनी नऊ तालांमध्ये खंड जाती त्रिपुट ताल,क्लिष्ट अशी रागम तालम पल्लवी आणि राग जयजयवंती यांचे सादरीकरण केले. या दोघींच्या राग मालिका आणि कर्नाटक शैलीतील रचनांच्या सहवादनाने उपस्थितांची मने जिंकली. राग मारुबिहागमध्ये संत जनाबाई यांचा ‘विठोबा चला मंदिरात…’ हा अभंग सादर करित त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.
या दोघींनाही रामकृष्णन (व्हायोलिन), दिल्ली साईराम (मृदंगम्) आणि कृष्णा (घटम्) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading