Wednesday, September 23, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; २७५ महसूल मंडळांत अत्यल्प पाऊस


पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासमोरचे संकट अधिक गडद झाले आहे. विशेषतः मराठवाड्यात परिस्थिती चिंताजनक असून, सुमारे ५० दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. विभागात पावसाची सुमारे १९९ मिलिमीटर तूट नोंदविण्यात आली असून तब्बल २७५ महसूल मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून आगामी काळातील पाणीटंचाईचे आव्हानही गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसाचे वितरण अत्यंत असमान राहिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांना पुरेशा पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. लातूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ४९.८२ टक्के पाऊस झाला असून धाराशिवमध्ये ५६.०३ टक्के, परभणीत ५५.२६ टक्के आणि बीडमध्ये ५८.५२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यांतील पावसाची स्थिती खरीप पिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ७२.६० टक्के, जालन्यात ४३८ मिलिमीटर म्हणजे ७२.७१ टक्के आणि नांदेडमध्ये ५७८ मिलिमीटर म्हणजे ७२.१८ टक्के पाऊस झाला आहे. हिंगोलीत ५४३ मिलिमीटर म्हणजे ६८.३३ टक्के पर्जन्यमान नोंदले गेले आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती पाहता लातूरमध्ये ३५१ मिलिमीटर, धाराशिवमध्ये ३३७ मिलिमीटर, बीडमध्ये ३३१ मिलिमीटर, परभणीत ४२० मिलिमीटर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४२२ मिलिमीटर, जालन्यात ४३८ मिलिमीटर, हिंगोलीत ५४३ मिलिमीटर आणि नांदेडमध्ये ५७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक भागांतील शेतकरी पिके वाचविण्यासाठी उपलब्ध पाण्यावर अवलंबून आहेत. धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती आणि भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज याबाबतही चिंता व्यक्त होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्याच्या दीर्घ कोरड्या कालखंडामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लक्ष पुन्हा एकदा आकाशाकडे लागले आहे. आगामी काळात दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामाबरोबरच पाणीटंचाईचे संकटही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading