Tuesday, September 22, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

डीजे-डॉल्बीसाठी वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केल्यास वाहन जागेवरच सील; पुणे पोलिसांचा कडक इशारा


पुणे प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकीसह आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टीमसाठी वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरबदल करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारचे मॉडिफाय वाहन आढळून आल्यास ते जागेवरच सील करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. हे आदेश १८ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.

सणांच्या काळात विविध मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यासाठी वाहनांच्या मूळ रचनेत बदल केले जातात. वाहनांच्या मागील किंवा इतर भागांवर टॉप, मिड आणि बेस अशा स्वरूपाच्या मल्टिस्पीकर सिस्टीमचे अनेक थर उभारून भिंतीसारखी रचना केली जाते. यासाठी वाहनाच्या मूळ संरचनेत अनधिकृतपणे बदल करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

अशा प्रकारे वाहनाच्या संरचनेत केलेले बदल नियमबाह्य असल्याने डीजे, डॉल्बी किंवा अन्य ध्वनिव्यवस्थेसाठी मॉडिफाय केलेल्या वाहनांचा वापर पूर्णपणे बंदी करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसह आगामी उत्सवांच्या काळात पोलिसांकडून या वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

मिरवणुकीत अशा प्रकारचे मॉडिफाय वाहन आढळल्यास संबंधित वाहनावर तातडीने कारवाई करून ते जागेवरच सील करण्याच्या सूचना पोलिस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन मालक, चालक तसेच उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करून अशा वाहनांचा वापर टाळावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
उत्सवाच्या नावाखाली वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून ती रस्त्यावर आणल्यास संबंधित वाहनमालक, चालक आणि आयोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांनी ध्वनिव्यवस्था तसेच वाहनांच्या वापराबाबत पोलिसांच्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading