येत्या ४ व ५ जानेवारी रोजी संपन्न होणार ‘तालचक्र युवा महोत्सव’
पुणे : तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेला, तालवाद्य व वादक यांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित करण्यात येणारा तालचक्र युवा महोत्सव शनिवार दि. ४ व रविवार दि. ५ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक आणि सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांनी कळविली आहे.
पहिल्या दिवशी (४ जानेवारी रोजी) सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेचे सभागृह तर दुसऱ्या दिवशी (५ जानेवारी रोजी) जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दोन्ही दिवशी सायंकाळी ५:०० वाजल्यापासून सदर महोत्सव संपन्न होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
महोत्सवाबद्दलची माहिती देताना प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं विजय घाटे म्हणाले, “तालवाद्य व वादक यांना केंद्रस्थानी ठेऊन गेली १२ वर्षे आपण तालचक्र महोत्सवाचे यशस्वी आयोजन करीत आहोत. संगीत क्षेत्रातील आश्वासक युवा कलाकारांना या महोत्सवामध्ये हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आपण तालचक्र युवा महोत्सव ही संकल्पना पुढे आणली. यावर्षीच्या महोत्सवामध्ये अनेक युवा व आश्वासक कलाकार आपली कला सादर करणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. याबरोबरच रविवारच्या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मन मोहयो सावरो’ हा घराणेदार हवेली संगीत प्रस्तुतीचा कार्यक्रम यावर्षीच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण असेल.”
तालचक्र युवा महोत्सवात शनिवार, दि. ४ जानेवारीच्या पहिल्या सत्रामध्ये प्रसिद्ध व्हायोलिन वादक पं अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य व सुपुत्र राजस उपाध्ये यांचे व्हायोलिन वादन रंगेल. यावेळी अमित कवठेकर (तबला), ओंकार इंगवले (पखवाज), अमन वरखेडकर (कीबोर्ड) हे साथसंगत करतील. पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रामध्ये उस्ताद रशीद खाँ यांचे शिष्य नागेश आडगांवकर यांचे गायन होईल. यावेळी पंडिता शोभा गुर्टू यांच्या रचना प्रस्तुत करतील. नागेश आडगांवकर यांना विनायक कुडलकर (तबला), अपूर्व पेठकर (हार्मोनियम) व ललित सिसोदिया (सारंगी) हे कलाकार साथसंगत करतील.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रविवार, दिनांक ५ जानेवारी रोजी शिव चोरडिया यांच्या एकल तबलावादनाने होईल. यानंतर पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य असलेले एस. आकाश (बासरी) आणि पं राजेंद्र वैष्णव यांचे शिष्य व सुपुत्र यशवंत वैष्णव (तबला) यांची जुगलबंदी रसिकांना अनुभवता येणार आहे. रविवारच्या शेवटच्या सत्रामध्ये ‘मन मोहयो सावरो’ हा आगळा वेगळा हवेली संगीतावरील कार्यक्रम संपन्न होईल. यामध्ये विनय रामदासन व अनुजा झोकरकर (गायन), अमित पाध्ये (ऑर्गन), शुभम उगळे (पखवाज), उमेश वारभुवन (तालवाद्य), भास्कर दास (बासरी), मकरंद शर्मा (साइड तालवाद्य), अमन रायथथा व केदार जोग (कोरस) हे कार्यक्रम प्रस्तुत करतील. तालवाद्य युवा महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे करणार असून महोत्सवासाठी निलेश यादव हे साउंड इंजिनिअर म्हणून काम करतील अशी माहिती आयोजकांनी कळवली आहे.
