गोकूळच्या निवडणुकीतही राहुल गांधींनी लक्ष घालण्याची गरज काय? फडणवीसांचा सवाल
मुंबई : गोकूळ दूध संघाच्या चेअरमन निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय वादात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लक्ष घातल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या राहुल गांधींना एका छोट्या निवडणुकीवर ट्विट करण्याची वेळ आली आहे. गोकूळमध्ये अवघे साडेचार हजार मतदार आहेत. त्यासाठी राहुल गांधींना दिल्लीत बसून ट्विट करावे लागत आहे. हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, तरीही ते या प्रकरणात पडत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
गोकूळ दूध संघाच्या चेअरमनपदाची निवड करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आणि कोरम पूर्ण होत नसल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. हा पेच सोडविण्यासाठीच राज्य सरकारने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या निवडीसाठी दोन ते तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र, प्रत्येक वेळी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने निवड प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. अशा परिस्थितीत चेअरमनची निवडच होऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.
गोकूळच्या संचालक मंडळात एकूण २५ सदस्य आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आणि संघाच्या उपविधीनुसार चेअरमन निवडीसाठी किमान १४ सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. सध्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडे १३, तर महायुतीकडे १२ सदस्यांचे पाठबळ आहे. यामुळे कोणत्याही गटाला आवश्यक संख्याबळ मिळत नसल्याचे चित्र आहे.
चेअरमन निवडीसाठी झालेल्या पहिल्या बैठकीला महायुतीचे १२ सदस्य अनुपस्थित राहिल्याने केवळ १३ सदस्य उपस्थित होते. परिणामी, कोरमअभावी बैठक रद्द करावी लागली आणि निवडणूक प्रक्रिया रखडली. अशाच प्रकारे वारंवार बैठका रद्द झाल्यास गोकूळवर प्रशासक नियुक्त करण्याची वेळ येऊ शकते. त्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवावी लागेल.
ही परिस्थिती टाळून चेअरमनची निवड मार्गी लावण्यासाठी सरकारने सदस्य नियुक्तीचा पर्याय स्वीकारल्याचा दावा फडणवीस यांनी केला. सरकारचा निर्णय न्यायालयीन किंवा कायदेशीर कसोटीवर टिकणार नसल्याची टीका काही जणांकडून होत आहे. मात्र, राज्याच्या महाधिवक्त्यांचे मत विचारात घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या कायदेशीर वैधतेबाबत सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
