ऊस उत्पादकांची दिवाळी रस्त्यावर गेल्यास कारखानदारांच्या दारात ‘शिमगा’ करू; राजू शेट्टींचा इशारा
सातारा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळत नसेल आणि सरकार व साखर कारखानदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांवर दिवाळी रस्त्यावर साजरी करण्याची वेळ आली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी साखर कारखान्यांचे चेअरमन व संचालकांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करतील, असा इशारा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
ऊसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा बुधवारी (५ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथेही आंदोलन सुरू असल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
साखर कारखानदार प्रतिटन ३,८०० रुपयांपेक्षा अधिक पहिली उचल देण्यास तयार नसल्याने दराचा प्रश्न चिघळला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या संमतीने सामंजस्याची भूमिका घेत मागणीमध्ये बदल करण्याची घोषणा केली. यापुढे प्रतिटन ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही चर्चेची दारे बंद केलेली नाहीत. कारखानदारांनीही अडेलतट्टू भूमिका सोडून शेतकऱ्यांना न्याय्य दर द्यावा. अन्यथा आंदोलनातून निर्माण होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन आणि साखर कारखानदारच जबाबदार असतील,” असा इशारा शेट्टी यांनी दिला.
दिवाळीचा सण जवळ आला असताना शेतकऱ्यांचा ऊस शेतात आणि दारात उभा आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सणाच्या काळात आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याचेही आंदोलनातून अधोरेखित होत आहे.
दरम्यान, आंदोलनामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना साताऱ्यातून सांगलीमार्गे वळसा घालावा लागत आहे. अवजड वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गावरून एक इंचही मागे हटणार नाही, असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
