गोकुळमधील राजकीय वेढा भेदणारच; सतेज पाटील यांचा विश्वास; छत्रपती शिवरायांच्या शिकवणीचा दिला दाखला
सांगली : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना, आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना ठाम प्रत्युत्तर दिले आहे. गोकुळमध्ये आपल्याभोवती कितीही राजकीय वेढा निर्माण केला तरी त्यातून आपण निश्चितपणे बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही वेढ्यातून बाहेर पडण्याची शिकवण दिली आहे, असे सांगत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. सांगली जिल्ह्यातील बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे संचालक मंडळात सतेज पाटील यांच्या आघाडीला निसटते बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी त्यांच्या आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महायुतीचे नेतेही संघावरील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने गोकुळवर शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यानुसार चार राजकीय प्रतिनिधी आणि एका शासकीय प्रतिनिधीची संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकारही असणार आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सतेज पाटील यांच्या आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता असून, त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर पेचात अडकू शकते. अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक आहे. मात्र, हा तांत्रिक मुद्दा असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकते, असे सतेज पाटील यांनी म्हटले आहे.
त्यामुळे गोकुळच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याकडे कोल्हापूरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारच्या निर्णयानंतरही आपली भूमिका ठाम ठेवत सतेज पाटील यांनी विरोधकांना राजकीय संघर्षासाठी तयार असल्याचा संदेश दिला आहे.
