इंडिक्युब स्पेसेस लिमिटेडने ₹850 कोटींच्या आयपीओसाठी दाखल केले डीआरएचपी
पारंपरिक कार्यालयीन अनुभवाला आधुनिक, शाश्वत आणि तंत्रज्ञान-आधारित उपायांनी बदलण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्य इंडिक्युब स्पेसेस लिमिटेड कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ)साठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केले आहे.
बंगळुरू स्थित इंडिक्युब ही कंपनी ख्यातनाम गुंतवणूकदार वेस्टब्रिज कॅपिटल आणि अशिष गुप्ता यांचे पाठबळ लाभलेली आहे. कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी दास, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक मेघना अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने उल्लेखनीय यश मिळविले आहे.
या आयपीओमध्ये ₹750 कोटींच्या फ्रेश इश्युसोबत ₹100 कोटींच्या प्रमोटर शेअर्सची विक्री (OFS) याचा समावेश आहे. त्यात प्रमोटर शेअरहोल्डर्स ऋषी दास आणि मेघना अग्रवाल यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
फ्रेश इश्युमधून मिळालेली रक्कम पुढील उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे: नवीन केंद्रांच्या स्थापनेसाठी भांडवली खर्च: ₹462.6 कोटी, कंपनीच्या कर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड: ₹100 कोटी, इतर सामान्य कॉर्पोरेट गरजा.
2015 मध्ये स्थापन झालेली इंडिक्युब स्पेसेस लिमिटेड ही कंपनी 13 शहरांमध्ये 103 केंद्रांचे व्यवस्थापन करते. 30 जून 2024 पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील एकूण सुपर बिल्टअप क्षेत्रफळ 7.76 दशलक्ष चौरस फूट असून, एकूण आसन क्षमता 1,72,451 इतकी आहे. कंपनीकडे जागतिक क्षमतेची केंद्रे (GCCs) आणि भारतीय उद्योग क्षेत्राचा समतोल ग्राहक पोर्टफोलिओ आहे.
इंडिक्युबच्या ग्राहकांमध्ये मिंत्रा, अपग्रॅड, झेरोधा, नो ब्रोकर, रेडबस, जसपे, पर्फिओस, मोगलिक्स, निंजाकार्ट, सिमेन्स, नारायण हेल्थ यांसारख्या GCCs, भारतीय कॉर्पोरेट्स, युनिकॉर्न्स आणि विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा समावेश आहे.
इंडिक्युब ग्रो ही कंपनीची प्रमुख सेवा आहे, जी प्लग अँड प्ले वर्कस्पेस सोल्युशन प्रदान करते. यामध्ये अंतर्गत सजावट, तंत्रज्ञान, सुविधांचे व्यवस्थापन आणि मूल्यवर्धित सेवांचा समावेश आहे. ग्राहकांच्या विशेष गरजांसाठी इंडीक्यूबने चार वेगवेगळ्या सेवा क्षेत्रांचा विकास केला आहे. त्यामध्ये इंडीक्यूब बिस्पोक, इंडिक्युब वन, मायक्युब (MiQube), इंडिक्युब कॉर्नरस्टोन यांचा समावेश आहे. इंडिक्युबची सेवा ग्राहकांच्या विविध गरजांना पुरविण्यासाठी डिझाइन केली गेली आहे, ज्यामुळे ती व्यवस्थापित कार्यस्थळ उपायांमध्ये अग्रगण्य ठरली आहे.
कंपनीने वित्तीय वर्ष 2024 मध्ये एकूण उत्पन्न ₹867.6 कोटी नोंदविले, जे वित्तीय वर्ष 2023 मधील ₹601.2 कोटींपेक्षा जास्त आहे. FY24 मध्ये EBITDA ₹263.4 कोटी होती, तर Q1FY25 मध्येच EBITDA ₹153 कोटींपर्यंत पोहोचली.
फ्लेक्सिबल वर्कस्पेसेस आता व्यावसायिक कार्यालयीन बाजाराचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. हायब्रिड वर्क मॉडेल्सचा उदय, भांडवलाचा योग्य वापर, लवचिकतेची गरज, वर्कस्पेस नियोजन आणि कार्यसंस्कृतीत बदल हे घटक फ्लेक्सिबल वर्कस्पेसेसच्या मागणीला चालना देत आहेत.
CBRE अहवालानुसार, भारतात सध्या फ्लेक्सिबल वर्कस्पेस स्टॉक 79 दशलक्ष चौ.फूट आहे, ज्यामधील 72 दशलक्ष चौ.फूट स्टॉक हे टियर 1 शहरांमध्ये आहे. 2027 च्या अखेरीस टियर 1 स्टॉक अंदाजे 124 दशलक्ष चौ.फूटपर्यंत वाढू शकते.
या इश्युसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड आणि जेएम फायनान्शिअल लिमिटेड काम पाहतील. कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE आणि NSE या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे.
