Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बांबू हस्तकला कौशल्याबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत सेवावर्धिनी व मेळघाट समूह यांच्या सहकार्याने ‘बांबू हस्तकला’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या बांबू हस्तकला केंद्र येथे प्र – कुलगुरु प्रा. (डॉ.) पराग काळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करणारे सेवावर्धिनीचे आनंद लिमये, गिरीश देवगावकर, कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. आर. एस. पंडित, प्रा. पुजा मोरे, प्रा. रवी आहुजा आदी उपस्थित होते.

बांबूच्या वस्तूचा जगभरात उपयोग होतो आहे. त्यामुळे बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे कौशल्य विद्यार्थ्यांना देऊन त्यामधून त्यांना व्यवसाय करता यावा व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करता यावा हा या एकदिवसीय प्रशिक्षणाचा हेतू आहे. सेवावर्धिनी मेळघाट सपोर्ट ग्रुप च्या सहकार्याने विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्रामार्फत बांबू हस्तकलाविषयक सदर प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षित शिक्षक विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी भागातील एकूण १२ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना बांबूपासून विविध वस्तूं तयार करण्याचे प्रशिक्षण देणार असून त्यामधून त्यांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होईल यासाठी विद्यापीठ प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी प्र – कुलगुरु प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी केले.

गुणवत्ता सुधार योजना (QIP) च्या माध्यमातून आदिवासी विभागातील १२ महाविद्यालयास १ लाख रुपयांचे अनुदान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने यापूर्वीच दिलेले आहे .सदर अनुदान हे बांबूच्या वस्तू साठी लागणारे मशीन अणि अवजारे घेण्यासाठी दिलेले आहे. गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत विद्यापीठ विविध उपक्रम करतच आहेत. तसेच विविध उपक्रमासोबत कौशल्यांनी व्यक्तींना सुसज्ज करण्यासाठी सतत शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचेही प्रा. (डॉ.) काळकर यांनी यावेळी अधोरेखित केले. या एकदिवसीय कार्यशाळेसाठी उपस्थित प्रशिक्षणार्थी, मार्गदर्शक यांचे स्वागत विभागाचे संचालक प्रा. डॉ. राधाकृष्ण पंडित यांनी केले. तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत सदरचे कौशल्य पोहोचणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचेही प्रा. (डॉ.) पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. सदरचे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास केंद्राचे प्रा. रवी आहुजा, सतीश वाघमारे आणि इतर सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यशाळेच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. संदीप पालवे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार आदींनी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्यासमवेत बांबू हस्तकला केंद्रास सदिच्छा भेट देत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading