लॉकर वापरताना बाहेर विसरलेले दागिने खातेदारांना परत
पुणे : जनसेवा सहकारी बँक लि.हडपसर.पुणे बँकेच्या शनिपार शाखेमध्ये बँकेचे खातेदार
पुजा जवेरी या दिवाळी निमित्त लॉकर आपरेट करणेकरीता आले असता त्यांच्या नजरचूकीने त्यांचे काही सोन्याचे जिन्नस लॉकर रुममध्ये विसरल्या, सदर बाब शाखेतील सेवक चैतन्य खाडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरीत शाखा व्यवस्थापक प्रसाद कानडे यांच्या निदर्शनास आणून दिली. शाखा
व्यवस्थापकांनी तातडीने सौ.पुजा जवेरी यांचेशी संपर्क साधून रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दागिन्यांची ओळख पटवून घेऊन त्यांच्या वस्तू परत सुपुर्त करण्यात आल्या.
बँकेच्या मार्केटयार्ड शाखेत देखील सेवक श्री.संजय गिरे आणि सेवक श्री.प्रदीप जगदाळे यांना देखील लॉकर रुममध्ये सापडलेल्या सोन्याचे जिन्नस खातेदार निता गुजर यांना नियमानुसार दागिन्यांची ओळख पटवून देऊन त्यांच्या वस्तू परत करण्यात आल्या. तसेच औंध शाखेमध्ये देखील खातेदार हेमंत तानवडे यांची हिऱ्याची अंगठी लॉकर आपरेट करताना बाहेर राहिली असता बँकेचे अधिकारी विनायक गायकवाड आणि अधिकारी रुपाली आढाव यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रामाणिकपणे खातेदारास परत केली. जनसेवा बँकेच्या तिन्ही शाखांमधील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकतेचा एक वस्तूपाठ घालून दिलेला आहे. खऱ्या अर्थाने असे सेवक कोणत्याही संस्थेचे भूषण असतात.
दागिने परत मिळाल्यामुळे खातेदारांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. बँकेतील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे जनसेवा बँकेचा आणि संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राचा लौकिक वाढण्यास मदत होईल असा विश्वास बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी व्यक्त केला.
