Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरक्षण वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची- प्रकाश आंबेडकर


यवतमाळ : सुप्रिम कोर्टाच्या निकालामुळे आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आरक्षण वाचविण्याच्या लढाईत तुम्ही आपल्या मतदानाचा हक्क बजवून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. ते यवतमाळ येथे प्रचार सभेत बोलत होते.

 

यवतमाळ मतदार संघातील डॉ. नीरज वाघमारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना ऍड.प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे अनुसूचित जाती/जमातीचे आणि ओबीसीचे आरक्षण धोक्यात आहे, असा इशारा मतदारांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषदांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय होणार असा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीत आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. ओबीसींची टक्केवारी किती ? हे माहीत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण थांबवण्यात आले आहे. ओबीसींना खुल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागेल. अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणाबरोबर क्रीमिलेयरची व्याख्या सुद्धा करण्यात आलेली आहे. ज्यांनी आरक्षणाचा एकदा लाभ घेतला असेल त्यांच्या वारसांना पुन्हा आरक्षण मिळणार नसल्याचा निकाल आल्याचे आंबेडकर यांनी सांगीतले.

राज्यातील मुस्लिम समाज प्रचंड दहशतीमध्ये आहे. औरंगाबाद येथे मुस्लिमांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदू मुस्लिम दंगली घडल्या. त्यामुळे मुस्लिम शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केल्यामुळे एडवोकेट प्रकाश आंबेडकरांनी स्वतः औरंगजेबाच्या समाधीवर चादर चढवली होती. औरंगजेबाच्या समाधीवर चादर चढवणे हा गुन्हा असेल तर आमच्यावर केसेस कराव्या असे विधान करून वंचित बहुजन आघाडीने मुस्लिमांच्या बाजूने संदेश दिल्याने महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम दंगली टळल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगीतले. मुस्लीम समाज वंचित बहुजन आघाडीसोबत आल्यास त्यांचे संरक्षण होईल असेही आंबेडकर म्हणाले.

भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आरक्षण विरोधी आहेत. आरक्षण विरोधी निकाल आल्यानंतर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले. आरक्षणवादी आमदार विधिमंडळात असल्याशिवाय आरक्षण वाचणार नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेस आणि भाजपावर निशाना साधला.

यवतमाळ विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निरज वाघमारे यांनी आपल्या भाषणातून जिल्हयातील नेत्यांना गब्बरची उपमा दिली. एक गब्बर नेता सर्वांना परिचीत आहे. दुसरा यवतमाळातील गुन्हेगारीला प्रोत्साहन देत असून तिसरा तरुणांना व्यसनाधिनतेकडे वळवित असल्याचा आरोप निरज वाघमारे यांनी केला. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही शहरांमध्ये महिलांच्या सार्वजनिक प्रसाधनगृहाची साधी व्यवस्था नाही, याबद्दल खंत त्यांनी व्यक्त केली. या सभेत अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हा निरीक्षक एड. प्रियदर्शी तेलंग, यवतमाळ मतदार संघाचे उमेदवार डॉ.नीरज वाघमारे, पुसद मतदार संघाचे माधवराव वैद्य, दारव्हा/दिग्रस मतदार संघाचे नाजुकराव धांदे, राळेगाव मतदार संघाचे किरण कुमरे, वणी मतदार संघाचे राजू निमसटकर आणि उमरखेड मतदार संघाचे उमेदवार तातेराव हनवते हे हजर होते. बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेपूर्वी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचे गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading