Friday, November 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजितदादा असते तर १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा दावा


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण दावा करत अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण निश्चित झाले असते, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया पुढे गेली असती, असे त्यांनी सांगितले. अजितदादांच्या निधनामुळे विलीनीकरणाचा विषय मागे पडला. ते हयात असते तर १२ फेब्रुवारी ही विलीनीकरणाची तारीख निश्चित झाली असती, असा दावा तटकरे यांनी केला.
तटकरे यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे. विलीनीकरणाला सुरुवातीपासूनच सुनील तटकरे यांचा विरोध होता. त्यामुळे आता ते अशा प्रकारचे विधान का करत आहेत, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.
देशमुख म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणण्याच्या दृष्टीने शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्या होत्या. त्यावेळी आम्ही सरकारमधून बाहेर पडून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती. मात्र, तटकरे यांनी त्यावेळी अशा कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचे सांगितले होते. संबंधित बैठक अन्य कारणासाठी झाल्याचा दावाही त्यांनी केला होता.
आता अजित पवार यांनीच विलीनीकरणाची कल्पना मांडली होती आणि १२ फेब्रुवारीला दोन्ही पक्ष एकत्र आले असते, असे तटकरे सांगत आहेत. मात्र, त्यावेळी ते या प्रक्रियेला विरोध करत होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत, अशी भूमिका त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून घेतली होती, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी म्हटले.
तटकरे यांच्या बदललेल्या भूमिकेमागील नेमके कारण काय, असा सवाल उपस्थित करत देशमुख यांनी त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून पक्षांतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा उफाळण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply