Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्री कोण यापेक्षा स्थिर सरकारला प्राधान्य  – शरद पवार

कोल्हापूर:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असतानाच पक्षप्रमुख शरद पवार यांनी त्याबाबत पक्षाचे धोरण स्पष्ट केले आहे. येईल त्याला सरसकट पक्षात घेतले जाणार नाही. येणारा नेता ज्या भागातील असेल त्या भागातील अडचणीच्या काळात आपल्याबरोबर राहिलेल्या निष्ठावान नेत्या कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र, शरद पवार गटाने या निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाला फार मोठ्या संख्येने जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे अजित पवार गटासह अन्य पक्षातूनही शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी त्याबाबतचे धोरण पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. 

कोणत्याही नेत्याला पक्षात प्रवेश देण्यापूर्वी त्याच्या भागातील स्थानिक निष्ठावंत नेते कार्यकर्त्यांचे मत निश्चितपणे विचारात घेतले जाईल. पक्षात येऊ इच्छिणाऱ्या नेत्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला जाईल. त्याचप्रमाणे संबंधित नेत्याला प्रवेश दिल्यास पक्षाला त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल, याची चाचपणी देखील केली जाईल, असे पवार यांनी सांगितले. 

कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलचे समरजीत घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाची कास सोडून शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे विशेषतः अजित पवार गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून ते देखील त्यांच्या गोटात सहभागी होण्याची चिन्ह आहेत. अजित पवार गटाला मोठे खिंडार पाडण्यासाठी शरद पवार यांनी चंग बांधला आहे. 

खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नका 

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही तर सुरतेवर आक्रमण केले, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावरून पवार यांनी फडणवीस यांना सुनावले आहे. चुकीचा किंवा खोटा इतिहास जनतेसमोर, विशेषतः युवा पिढीसमोर मांडू नका. तसे केल्याने समाजात गैरसमज पसरण्याची शक्यता असते, असे पवार म्हणाले. 

नवख्या शिल्पकाराला काम देणे अयोग्य 

मालवणच्या राजकोट किल्ल्यात शिवछत्रपतींचा पुतळा ढासळण्याच्या घटनेवरही पवार यांनी भाष्य केले. जयदीप आपटेसारख्या नवख्या शिल्पकाराला शिवछत्रपतींचा भव्य पुतळा तयार करण्याचे काम देणे अयोग्य होते. त्याने यापूर्वी इतके मोठे काम केल्याचे दिसून येत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही मंडळी वेगवान वाऱ्यामुळे पुतळा ढासळल्याचे सांगत आहेत. मात्र, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्र किनाऱ्यावर छत्रपतींचा पुतळा दीर्घकाळ उभा आहे. त्यामुळे अशाप्रकारे या घटनेची कारणमीमांसा करणे चुकीचे आहे, असेही पवार यांनी नमूद केले. 

बदलापूरचे आंदोलन हा जनतेचा उद्रेक

चिमुकल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे बदलापूर येथे झालेले आंदोलन हा स्थानिक जनतेच्या संतापाचा उद्रेक होता. त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जबाबदार धरणे अयोग्य आहे. बदलापूर येथे जमलेले लोक आम्ही जमवलेले नव्हते. घडलेल्या घटनेने संतप्त झालेले स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते, असेही पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री कोण यापेक्षा स्थिर सरकारला प्राधान्य 

विधानसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त करून राज्याला स्थिर सरकार प्रदान करणे याला महाविकास आघाडीचे प्राधान्य आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक असेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे सांगत शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदचा चेहरा जाहीर करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर आणि उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याच्या दाव्यावर पवार यांनी बोळा फिरवला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading