Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर

पुणे: गणेशोत्सवासारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक एसटी आगारातील बसेस ठप्प झाल्या असून अनेक बस स्थानकांमध्ये प्रवासी खोळंबलेले आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या ११ संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या वतीने संपाची हाक देण्यात आली आहे. वेतनमान सुधारणेसह अन्य आर्थिक मागण्या मान्य करा आणि एसटीच्या खाजगीकरणाचा छुपा डाव रद्द करा यादेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या मागण्या मान्य कराव्या, असा कर्मचारी संघटनांचा आग्रह आहे. या संपामुळे प्रामुख्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

पुणे शहरातील शिवाजीनगर वगळता सर्व आगारात आज दुपारपर्यंत एसटी वाहतूक सुरळीत सुरू होती. मात्र, जिल्ह्यातील भोर, सासवड, बारामती, तळेगाव आणि पिंपरी चिंचवड मधील वल्लभनगर या आगारातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.  मुंबई सेंट्रल आगारात खोळंबलेल्या प्रवाशांनी रुद्र रूप धारण केल्यामुळे एसटी प्रशासनाने पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून काही बसेस मार्गावर सोडल्या. मुंबईतील इतर आगारांमध्ये अद्याप एसटी वाहतूक सुरळीत आहे. मराठवाड्यातील बहुतेक आगारात एसटी वाहतूक ठप्प आहे. सोलापूर आणि कोल्हापूर येथील एसटी आगार पूर्णपणे बंद आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस, तर कराड, वडूज आणि महाबळेश्वर या आगारात एसटी वाहतूक ठप्प आहे. नाशिक, पिंपळगाव, पेठ, चाळीसगाव, भुसावळ या आगारातील वाहतूकही पूर्णतः बंद आहे. संभाजीनगर, धुळे यासह कोकणातील दापोली, गुहागर या ठिकाणी एसटी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading