विधानसभा निवडणुक २०२४ : भाजप १५० जागा लढवण्यावर ठाम
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत १५० जागा लढवण्यावर भारतीय जनता पक्ष ठाम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महत्त्वाकांक्षाही वाढल्या आहेत. महायुतीतील इतर छोट्या घटक पक्षांच्याही काही जागांच्या मागण्या आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपा दरम्यान रस्सीखेच बघायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विधानसभा निवडणुकीत ६० जागांवर समाधानी असणार नाही. आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्या असा पक्षातील नेत्यांचा सूर अंतर्गत बैठकीत दिसून आला. पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पक्षाची अंतर्गत बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत उपस्थित नेत्यांनी पक्षाने महायुतीकडे 60 पेक्षा अधिक जागांची मागणी करावी, असा आग्रह धरला.
नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी काँग्रेसचे तीन आणि अपक्ष तीन आमदार आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सध्या ५४ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला ६० पेक्षा अधिक जागा मिळाव्या अशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आग्रही मागणी आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे अजित पवार यांच्या पक्षाला खिंडार पाडण्यासाठी सापळा लावून बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारशी चमकदार कामगिरी करताना आल्यामुळे आणि मुख्यतः शरद पवार यांच्या गटाने उल्लेखनीय यश प्राप्त केल्याने अजित पवार गटातील अनेक जण शरद पवार गटात जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अजित पवार गटाला कोंडीत गाठले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप कसे होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
