बीएनसीएमध्ये 26वा आर्किटेक्चर पदवी व पदव्युत्तर प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न
पुणे : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) 26व्या पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील मिळून 175 विद्यार्थिनींसाठी प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या शहर नियोजन विभागाचे संचालक अविनाश पाटील, बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, उपप्राचार्य डॉ. शार्वेय धोंगडे आणि प्राध्यापक वर्ग यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रमाणपत्र घेतलेल्या विद्यार्थिनींचे पालकही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थिनींमध्ये आर्किटेक्चरच्या पदव्युत्तर वर्गात सर्वप्रथम आलेल्या पूजा शहा (डिजिटल आर्किटेक्चर), ऋतुजा दाते (एनव्हायरमेंटल आर्किटेक्चर) आणि मृगजा पवार (लॅण्डस्केप आर्किटेक्चर) यांचा समावेश आहे. तसेच आर्किटेक्चरच्या पदवी परीक्षेत सर्व वर्गांमध्ये सर्वप्रथम व ब तुकडीत संशोधन कार्यात प्रथम : काजल गरवाल, अ तुकडीत सर्वप्रथम : अपूर्वा काटे, संशोधन कार्य: आदिती रानवरे, क तुकडीत सर्वप्रथम: निकिता मोहोळ, संशोधन कार्य: मोनिका साठे,ड तुकडीत सर्वप्रथम शमिता पै, संशोधन कार्य: श्रेया कोलते यांनाही पदवी प्रदान करताना गौरवण्यात आले.
पाटील म्हणाले की, खासगी क्षेत्रातील व्यवसाय व नोकऱ्यांबरोबरच राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) तसेच शहर नियोजन (टाऊन प्लॉनिंग) विभागात आर्किटेक्ट प्रमाणपत्र धारकांसाठी प्रतिष्ठेच्या पदांसह नोकरीत पुरेसा वाव मिळणार आहे.याचे कारण अभियंत्यांबरोबर आता आर्किटेक्चर पदवीधारकांची मागणीही वाढू लागली आहे. डिझाईन तयार करणे हा आर्किटेक्चरचा पाया आणि कौशल्य असल्याने तसे मनुष्यबळ सरकारी नोकरीतही हवे आहे.
डॉ. कश्यप यांनी महर्षी कर्वे यांची परंपरा सांगणाऱ्या बीएनसीएचा गेल्या तीन दशकांमधील उत्तुंग कामगिरीचा विस्ताराने आढावा घेतला आणि सांगितले की, पदवीधर विद्यार्थिनींनी नोकरी करण्याबरोबरच स्वतंत्रपणे काम करणारे उत्तम व्यावसायिक बनायला हवे. यासाठी बीएनसीए एक कुटुंब म्हणूनही त्यांच्या मागे आयुष्यभर भक्कमपणे उभी राहील. डॉ. धोंगडे यांनी कोवीड-19च्या साथीमधून गेलेल्या पदवीधारकांच्या कष्टप्रद वाटचालीचे विशेष कौतुक केले.
यावेळी बीएनसीएच्या संशोधन केंद्राच्या प्रमूख डॉ.स्वाती सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत ‘बिल्ट ॲण्ड बियाँड 2.0: थिअरी, प्रॅक्टीस ॲण्ड पॅडागोगी’ (बांधकाम आणि त्या पलीकडील वाटचाल 2.0: सिद्धान्त, प्रघात आणि अध्यापनशास्त्र) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या कामकाजाच्या लेखी अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
समारंभाचे सूत्रसंचालन आदिती सपकाळ, जान्हवी केतकर आणि इशा चौधरी या विद्यार्थिनींनी केले, तर प्रा. सौरभ मराठे यांनी आभार मानले.
