Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

आयुर्वेदाला प्रतिष्ठेचे स्थान मिळणे गरजेचे – डॉ. मधु चोप्रा

पुणे : आयुर्वेद ही पिढ्यान्‌‍पिढ्या चालत आलेली  वैद्यकीय चिकित्सा पद्धत असून प्रतिष्ठेचे स्थान मिळणे हा तिचा हक्क आहे, असे मत प्रख्यात सौंदर्योपचारतज्ज्ञ (कॉस्मेटोलॉजिस्ट) डॉ. मधु चोप्रा यांनी येथे व्यक्त केले. मॉडेल कॉलनीमध्ये ‘सोलवेदा वेलनेस अँड पंचकर्म क्लिनिक’च्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. शारंगधर फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक डॉ.जयंत अभ्यंकर यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले.
डॉ. चोप्रा म्हणाल्या की, माझ्या कुटुंबात एक एमबीबीएस आणि एक आयुर्वेद तज्ज्ञ होते आणि याचे फायदे मी पाहिले आहेत. आयुर्वेद हे एक शास्त्र असून पिढ्यानपिढ्या चालत आले आहे. आपल्याला तथ्यांवर आणि विज्ञानावर आधारित विविध वैद्यकीय उपचार पद्धतींचा अवलंब करताना समतोल साधणे गरजेचे आहे.
तरुणाईसोबत संवाद साधताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती ही विशेष आहे आणि आपले शारीरिक रुप मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम करणारे ठरु नये, दिखाव्याचे कारण बनू नये तर सौंदर्य चिकित्सा गरजेनुसार असावी. व्यायाम, ध्यानधारणा आणि आरोग्यपूर्ण पोषक आहार अशी शिस्त सातत्याने पाळत आल्याचा फायदा मला  ऊर्जा पातळी राखण्यात झाला आहे. निरोगी राहण्यातील एक पायरी म्हणून आपण हंगामी आणि स्थानिक पदार्थ खाणे आवश्यक आहे.
डॉ.जयंत अभ्यंकर म्हणाले की, प्रत्येक वैद्यकीय शाखेचे स्वत:चे बलस्थान आणि मर्यादा असतात. या सर्व चिकित्सा पद्धतींचा समन्वय साधणे लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शारंगधर कंपनीच्या प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही सन १९८५ मध्ये कार्याला सुरूवात केल्यापासून लोकांच्या विचारप्रक्रियेत अनेक बदल पहिले आहेत. कोविडनंतर लोकांच्या लक्षात आले आहे की, कुठल्याही आरोग्य समस्येच्या मूळ कारणापर्यंत पोचल्याशिवाय तिचे निराकरण होऊ शकत नाही आणि म्हणून आयुर्वेदाचे महत्त्व वाढत आहे. शरीरात रोग बरे करण्याची आणि रोगप्रतिबंधक शक्ती आधीपासून असते आणि आपल्याला ती वाढवावी लागते. याआधी आम्ही केवळ आयुर्वेदिक उत्पादने बनवत होतो, परंतु आता ‘सोलवेदा’च्या माध्यमातून सेवा उद्योगात पदार्पण केले असून आरोग्यविषयक संपूर्ण पर्याय देऊ करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading