एकदा सत्ता द्या, कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून देऊ – राज ठाकरे
यवतमाळ : सध्याच्या काळात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मतदारांनी एकदा सत्ता आपल्या हाती द्यावी, कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thakare) यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) अनुषंगाने उमेदवारीची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले राज ठाकरे यवतमाळ मधील वणी येथे सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाकडून राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली. या विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे म्हणाले, सध्याच्या काळात पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे त्यांना काही गोष्टी करणे शक्य होत नाही. दबावाला झुगारून त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे निलंबन केले जाते. त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो. एकदा महाराष्ट्राची सत्ता या राज ठाकरेच्या हाती देऊन बघा. कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून देईन. कोणाची कुठल्या महिलेकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमतही होणार नाही.
.. तर मुंबई ४८ तासात गुन्हेगारीमुक्त
बदलापूर (Badlapur child abuse case) येथील चिमुरड्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर बोलताना ठाकरे यांनी कायद्याचा वचक राहिला नसल्याचे निरीक्षण नोंदविले. या परिस्थितीला पोलीस कारणीभूत नाहीत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. पोलिसांवरील राजकीय दबाव दूर केला तर केवळ 48 तासात पोलीस राजधानी मुंबईची साफसफाई करून दाखवतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
राजकारणाचा झाला आहे चिखल
सध्याच्या काळात राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. आज तुम्ही एखाद्याला विश्वासाने मत देता. दुसऱ्या दिवशी ते विकले जातात. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात असेल, हे सांगताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्हाला या गोष्टीचा राग येत नाही का? विधानसभा निवडणूक ही हा राग व्यक्त करण्याची जागा आहे, असे ठाकरे मतदारांना उद्देशून म्हणाले.
शिवकाळातील चौरंगाची शिक्षा लागू करा
बदलापूर येथे छोट्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. मनसेच्या महिला आघाडीने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. तोपर्यंत ते दाबून ठेवले होते. असे प्रकार करणाऱ्या नराधमांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात केली जाणारी चौरंगाची शिक्षा पुन्हा लागू करावी, असेही ठाकरे म्हणाले.
