डाव्या व समविचारी पक्षांनी महाविकास आघाडीत सहभागी व्हावे – शरद पवार
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डाव्या आणि समविचारी पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) झेंड्याखाली मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
महायुतीला पर्याय उभा करण्यासाठी राज्यातील डाव्या आणि समविचारी पक्षांनी महाविकास आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करून पवार म्हणाले की, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लवकरात लवकर मतदार संघाबाबत निर्णय घ्यावा, उमेदवार निश्चित करावे आणि महायुती समोर प्रबळ पर्याय उपलब्ध करून द्यावा.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची जागावाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आता 27 तारखेला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक होणार असून त्यात जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात येणार आहे.
आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे अयोग्य
बदलापूर (Badlapur child abuse case) लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेले आंदोलन ही लोकांची संतप्त प्रतिक्रिया होती. उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेली जनभावना होती. त्यामुळे सरकारने आणि गृहमंत्रालयाने हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळणे गरजेचे आहे. याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे अयोग्य आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. बदलापूरची घटना ही धक्कादायक आहे. मुली व महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. सरकारने याबाबत सतर्क राहून कठोरात कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.
सहकार चळवळीत राजकारण आणू नका
आतापर्यंत सहकार चळवळीत राजकारण आणले जात नव्हते. सर्वच सहकारी संस्था आणि कारखान्यांना सरकारकडून त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मदत केली जात होती. सहकारी चळवळ पुढे नेण्यासाठी सरकारकडून धोरणे आखली जात होती. अडचणीतल्या कारखान्यांना मदत केली जात होती. सध्या तसे घडताना दिसत नाही. सहकारी चळवळीत राजकारण आणले जात आहे. ही बाब निश्चितपणे अयोग्य आहे, असेही पवार म्हणाले.
