विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच – जयंत पाटील
मुंबई : महायुती सरकारला निवडणुकांची भीती वाटते. मागच्या दोन वर्षात या सरकारने ज्या पद्धतीने काम केले आहे त्यामुळे ते निवडणुकीला सामोरे जाण्यास घाबरतात. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याऐवजी दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला. प्रत्यक्षात ते 240 वर थबकले. आंध्र प्रदेश आणि बिहारकडून टेकू मिळाल्याने केंद्रात त्यांचे सरकार सत्तेवर आहे. मात्र, हा टेकू देणारे लोक पलटू आहेत. त्यामुळे हे सरकार किती काळ चालणारा हा प्रश्नच आहे, असेही पाटील म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असणार आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र राहिले तर आगामी काळात सत्ता आपल्याकडेच येणार आहे. लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात पिपाणीला 37 हजार मते गेल्यामुळे आपली जागा गेली. मुंबईतील आपली एक जागा सत्ताधाऱ्यांनी चोरली. मात्र, विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपच्या दोन आमदारांनी लाटल्या देवस्थानच्या जमिनी
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांनी देवस्थानच्या जमिनी लाटले आहेत. या गैरप्रकाराला आपण सभागृहात वारंवार वाचा फोडली आहे. अशा जमिनी घेताना नजराणाची रक्कम भरावी लागते. या आमदारांनी नजरान्याची केवळ पन्नास टक्के रक्कम भरली आहे. आता सरकारने नजराणा कमी केला आहे. हे सरकार देवस्थानांच्या जमिनी लाटत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.
