Thursday, July 2, 2026
BLOGLatest News

चुकीला माफी नाहीच.. तरीही..

गुन्हेगारी जगताची सत्यकथा

पांढरा स्वच्छ कपड्यातील आसिफ विमानातून खाली उतरला. दुबईचे झगमग ते विमानतळ बघून त्याची नजर हरखुन गेली. तिथे त्याच्या स्वागतासाठी मेहमूद होताच. त्याने त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याचे स्वागत केले. आसिफची गळाभेट घेऊन तो त्याला एका आलीशान गाडीकडे घेऊन गेला. दोघेही गाडीत बसले आणि गाडी एक झोकदार वळण घेऊन दुबईतल्या रस्त्याला लागली. दुबईचा चमचमता थाट बघून आसीफची नजर थबकून गेली. त्याचं भानच हरपून गेलं. मेहमूदश एक शब्दही बोलावं असं त्याला वाटलं नाही. तो फक्त दुबईचे रस्ते, आकाशाला भिडणार्‍या इमारती आणि निरभ्र आभाळात चांदण्याची रांगोळी घालावी तशी दिसणारी दिव्यांची आरास बघत राहिला.

अक्षर एका भव्य हवेलीच्या प्रवेशद्वारासमोर गाडी थांबली तेव्हा आसिफ भानावर आला. मेहमूदने गाडीचा दरवाजा उघडून आसिफ ला बाहेर येण्याची खूण केली. आसिफने गाडीच्या बाहेर पडून कपडे ठीकठाक केले. केसांवरून हात फिरवला. प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांनी दोघांची झाडाझडती घेतली. हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर दोघांनी हवेलीच्या पायऱ्या चढून दिवाणखान्यात प्रवेश केला. दोघांनाही फळांचा ज्यूस देण्यात आला.

थोडा वेळ वाट बघितल्यानंतर तलम कपड्यातील कुर्ता पायजमा परिधान केलेल्या सुलेमान भाईचं दिवाणखान्यात आगमन झालं. दोघेही आदराने उठून उभे राहिले. बाईच्या चेहऱ्यावर हलकसं स्मितहास्य उमटलं. त्याच्या नजरेतून प्रेम आणि अभिमान ओसंडून वाहत होता. कुणाला जाणवलं की नाही कुणास ठाऊक पण त्याच्या नजरेत एक दुःखाची अनिवार किनार होती. आसिफ झटकन पुढे झाला आणि त्याने बाईला मिठी मारली. भाईनेही त्याला प्रेमाने पाठीवर आणि डोक्यावर कुरवाळलं. एकमेकांशी काहीही न बोलता दोघेही बाजूला झाले. आसिफ आदमीने एक पाऊल मागे सरकला. इतक्यात बाईच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलत गेले. कुर्त्याच्या खिशात हात घालून भाईने झटकन पिस्तूल काढले आणि आसिफच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. आसिफचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. तिथे असलेले सर्वजण स्तिमित होऊन भाईकडे बघत राहिले…
……………….
मुंबई ही भारताची मायानगरी आणि तितकीच मायावी नगरीही! हे महानगर देशाची आर्थिक राजधानी आहे आणि गुन्हेगारी जगताचीही! साधारणपणे 90 च्या दशकात मुंबईच्या आर्थिक विकासाला लक्षणीय वेग आला होता. त्याचप्रमाणे इथली गुन्हेगारीही वेगाने फोफावली होती. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व मिळवण्यासाठी डोळ्यात डोळ्यांमध्ये रोज संघर्ष होत होता. भर दिवसा रस्त्या रस्त्यांवर प्रतिस्पर्ध्यांचे बळी घेतले जात होते. बांधकाम क्षेत्र, सिनेमा या नेहमीच भरभराटीला असलेल्या क्षेत्रांप्रमाणेच अन्य उद्योग व्यवसायांची आणि अर्थातच त्यातून पैसा कमावण्याची संधी जागतिकीकरण आणि उदारीकरणाने उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे या महानगरीत संघटित गुन्हेगारीचा पाया घालणाऱ्या आणि इथे समांतर सत्ता राबविणार्‍या हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार यांच्या नंतरची दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी यांच्यासारख्या गुंडांची शहरात दहशत होती. त्यांचे इतके बलशाली नसलेले आणि तेवढा आवाका नसलेले, मात्र, एखाद्या ठराविक ‘एरिया’त अनभिषिक्त सत्ता असलेले अनेक गावगुंड या शहरात निर्माण झाले. सुलेमान भाई हा त्यापैकीच एक! मुंबईच्या एका विशिष्ट भागात त्याचा चांगलाच दबदबा होता.

सुलेमान भाईच्या टोळी त्यावेळी दोन महत्त्वाचे मोहरे होते. त्याचे कान आणि डोळेच नव्हे तर जणू काही गळ्यातील ताईतच! एक म्हणजे आसिफ आणि दुसरा म्हणजे मेहमूद. आसिफ हा भाईच्या टोळीतील मोजक्या शार्प शूटर पैकी एक महत्त्वाचा शूटर. एकदम विश्वासू आणि खतरनाक माणूस. कोणाला धमकवायचं असं वाटप करायचं असो, आसिफ वर काम सोपवलं की ते पूर्ण झालं म्हणून समजा. त्याच्यावर भाई ने काम सोपवलं आणि पूर्ण झालं नाही असं कधीच घडलं नाही. त्यामुळे तो भाईचा ‘डार्लिंग’ होता.

मेहमूद हा भाईच्या टोळीचा ब्रेन होता. आपल्या इलाख्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची त्याला खबर असायची. कुठल्या जागेचा कुठल्या बिल्डरने कितीला व्यवहार निश्चित केला, कोण कुठे नवा प्रोजेक्ट कधी सुरू करतोय, कुठला निर्माता, कोणता फायनान्सर कोणत्या चित्रपटात किती पैसे घालतोय, कोणत्या नट-नट्यांचं कोणाशी लफडं सुरू आहे, ते कुठे कुठे भेटतात, कोणकोणत्या हॉटेल आणि डान्सबारमध्ये नोटांची बरसात होते, ती नेमकी कोणाकडून होते याबाबतची सगळी खबरबात मेहमूदकडे असायची. मुंबईतल्या, विशेषतः सुलेमान भाईच्या इलाख्यातल्या सगळ्या श्रीमंत मंडळींची यादी, कोणाकडून कितपत खंडणी, गुन्हेगारी जगताच्या भाषेत ‘प्रोटेक्शन मनी’ मिळू शकतो याच्या उल्लेखासह मेहमूद कडे तयार असायची. ही यादी नियमितपणे अपडेट केली जायची. या यादीच्या आधारावर सुलेमान भाई कोणाला आपल्या जाळ्यात ओढायचे याचा निर्णय घ्यायचा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading