Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

सुप्रिया विरोधात सुनेत्रा पवारांना उभे केले ही चूकच – अजित पवार

मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आपली चूक झाली. राजकारण घरापर्यंत आणणे योग्य नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी दिली.

राजकारण घरापर्यंत न्यायला नको होते. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत व्हायला नको होती. मात्र, पक्षाच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

अजित पवार सध्या जन सन्मान यात्रेत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांना रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाणार का, अशी विचारणा केली असता, दौऱ्या दरम्यान आपण बारामतीच्या जवळपास असू तर नक्की बहिणीकडे जाऊन राखी बांधून घेऊ, असे अजित पवार म्हणाले.

पिंक पॉलिटिक्सची चर्चा 

लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने मतदारांना आकृष्ट करण्यासाठी चंग बांधला आहे. पक्षाच्या प्रचार प्रसिद्धीसह अजित पवार यांच्या प्रतिमा संवर्धनासाठी एका खाजगी व्यावसायिक कंपनीला काम देण्यात आले आहे. या कंपनीच्या सांगण्यानुसार अजित पवार गटाने महिला मतदारांवर लक्ष अधिक केंद्रित केले आहे. अजित पवार प्रत्येक जाहीर कार्यक्रमात गुलाबी जाकीटाचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे जन सन्मान यात्रेत सहभागी असलेल्या सर्व गाड्यांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. या गुलाबी रंगावरून शरद पवार, रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. मात्र, एकूण अजित पवार यांचे पिंक पॉलिटिक्स चांगलेच चर्चेत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading