भाजपचा आगामी राष्ट्रीय अध्यक्ष महिला असणार ?
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यापासून पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचा आगामी अध्यक्ष महिला किंवा इतर मागास प्रवर्गातील असावा, अशी चर्चा करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सरचिटणीस दत्तात्रय होसबळे आणि सह सरचिटणीस अरुण कुमार तर भाजपच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री आणि विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा व राजनाथ सिंह उपस्थित होते.
सन 2029 मध्ये होणारे लोकसभा निवडणुकीपूर्वी संसद आणि राज्यांच्या विधिमंडळामध्ये महिला कोटा अमलात आणला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद महिलेला देण्यात यावे, याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
संघाशी विचारविनिमय करून आगामी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाईल, अशी ग्वाही भाजपच्या वतीने या बैठकीत देण्यात आली तर सक्षम व्यक्तीला अध्यक्ष म्हणून निवडण्यात यावे, अशी सूचना संघाच्या वतीने करण्यात आली.
बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षेबाबत चर्चा
बांगलादेशात अराजकसदृश परिस्थिती असून अल्पसंख्य हिंदूंवर हल्ले होत आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबतही संघ आणि भाजपच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्र सरकारने भारत-बांगलादेश सीमेवरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ईशान्येकडील अनेक सीमावर्ती राज्यांनी बांगलादेशींना आश्रय देण्यास नकार दिला आहे. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू हे त्या देशाचे नागरिक असल्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तिथल्या सरकारने घ्यावी, असा संदेश भारत सरकारने बांगलादेशच्या सरकारपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा संघाकडून व्यक्त करण्यात आली.
