Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRA

खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या निवडीला पराभूत अपक्ष उमेदवार ऍड. राजू पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांनी बारणे यांच्यावर धार्मिक ध्रुवीकरणासह अनेक आरोप केले असून स्थानिक प्रशासनाने आपल्या तक्रारींची दखल घेतली नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचा पराभव करून बारणे निवडून आले आहेत. या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत अनेक गैरप्रकार झाले. त्याबद्दल आपण स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप करीत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

प्रचारादरम्यान बारणे यांनी धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळविली. त्याचे पुरावे याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. याबाबत निवडणूक काळात प्रशासन आणि पोलिसांकडे केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही, असे पाटील यांनी सांगितले.

या मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी अनेक अनोळखी लोक मतदान केंद्रात फिरत होते. त्याबद्दलही आपण पोलिस आणि प्रशासनाकडे तक्रार केली. त्याचीही दखल घेण्यात आली नाही, असा पाटील यांचा दावा आहे. या मतदारसंघात झालेले मतदान आणि मोजणी करण्यात आलेली मते यामध्ये ५७३ मतांची तफावत आहे. एवढी मोठी तफावत हे मतदानात गैरप्रकार झाल्याचे दाखवून देत आहे, असाही पाटील यांचा दावा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading