जागावाटपासाठी लवकरच चर्चा – अजित पवार
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महायुतीतील ज्या जागांवर ज्या पक्षाचे विद्यमान खासदार असतील त्या जगात त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. मात्र, काही जागांवर परस्पर सहमतीने अदलाबदल करण्याची मानसिकता ही महायुतीतील घटक पक्षांनी ठेवली आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
अधिकाधिक मतदारसंघात साधणार संपर्क
विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जनसंमान यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारसंघांपर्यंत पोहोचून मतदारांशी संपर्क साधला जाणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
अल्पसंख्य समाजासाठी मार्टीची स्थापना
आपला पक्ष फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या माध्यमातून पुढे जात आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आपली भूमिका आहे. महायुती सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक चांगल्या योजना अंमलात आणले आहेत. या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत जनसमान यात्रेद्वारे पोहोचविण्यात येईल असेही पवार म्हणाल.
इतरांवर अन्याय न करता मराठा आरक्षणाचा प्रयत्न
मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना इतर समाजांवर अन्याय होणार नाही अशी सरकारची भूमिका आहे. यापूर्वी देखील त्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. त्याबाबत सर्व पक्षांचे एकमत होते. काही निर्णय उच्च न्यायालयात टिकू शकले नाहीत तर काही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना टिकाऊ आणि इतर समाजावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे पवार यांनी सांगितले.
