सर्व बलुतेदारांना देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने फसवलय – मनोज जरांगे पाटील
मुंबई : आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाबरोबरच धनगर, लिंगायत आणि सर्वच बलुतेदारांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने फसविले आहे. या कृत्याची किंमत त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे मोजावी लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
रॅलीला गालबोट लावण्याचा भाजपचा डाव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने काढलेल्या रॅलीत आपले लोक घुसवायचे. त्यांच्याकडून दगडफेकीसारखे हिंसक प्रकार घडवून आणायचे आणि रॅलीला गालबोट लावायचे, असा भारतीय जनता पक्षाचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. मराठ्यांच्या संयमाचा अंत बघण्याची सरकारची इच्छा आहे. मात्र, संयम सोडू नका. रॅलीला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य घडू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी मराठा आंदोलकांना केले आहे. रॅलीत गडबड करण्यासाठी भाजपाने अनेकदा नियोजन केले. मात्र, एकदा रॅलीत घुसलो तर बाहेर येता येईल का, अशी शंका त्यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांचे धाडस होत नाही, असा दावाही त्यांनी केला.
ज्यांना समाजाने मोठे केले तेच…
भाजपमधील मराठा समाजाच्या आमदारांना समाजाने मोठे केले आहे. मात्र, तेच आज समाजाच्या विरोधात बोलत आहेत. त्यांचा नेता आपल्या जातीच्या विरोधात कारस्थाने करत आहे. षडयंत्र रचतो आहे. माझ्यामागे विशेष तपास पथकाचा ससेमिरा लावतो आहे.
