जनतेकडून निश्चितपणे न्याय होईल याची खात्री – उद्धव ठाकरे
पुणे: आमदार अपात्रतेबाबात न्यायालयाचा निर्णय केव्हाही येऊ द्या. आम्ही जनतेच्या न्यायालयात उभे आहोत. शिवसैनिक हा वकील आणि जनता ही न्यायाधीश आहे. जनतेकडून निश्चितपणे न्याय होईल याची खात्री आहे, अशा शब्दात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. जनतेच्या न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडा, असेही ते शिवसंकल्प मेळाव्यात शिवसैनिकांना उद्देशून म्हणाले.
न्यायालयाला एकदाच विनंती करू….
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही विभाजन झालेल्या पक्षांच्या आमदार अपात्रतेबाबत याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यांची सुनावणी ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, यावेळी एकदाच न्यायालयाला लवकर न्याय मिळावा यासाठी विनंती करणार आहोत. त्यानंतर तोल निकाल एक महिन्यांनी, सहा महिन्यांनी, पाच वर्षांनी, दहा वर्षांनी कधीही लागो. जनतेच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे.
गद्दारांच्या छाताडावर पाय रोवून…
आपले हिंदुत्व हे साधुसंतांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आहे. मिर्झाराजा जयसिंग हा देखील हिंदूच होता. मात्र, तो औरंगजेबाचे पाय चाटणारा होता. सागराएवढी फौज घेऊन तो स्वराज्यावर चालून आला. छत्रपतींचा जीव सिंहासनावर नाही तर आपल्या रयतेवर आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने रयतेची कत्तल सुरू केली. नाईलाजाने छत्रपती. तिथून परत आले त्यावेळी गड किल्ले, साधनसामग्री काहीही हाताशी नव्हते. तरीही महाराजांनी धीराने पुन्हा औरंगजेबाच्या छाताडावर पाय ठेवून स्वराज्याची उभारणी केली. आपल्या गद्दारांनी ही पक्ष चोरला. चिन्ह चोरले. वडिलांचा फोटो ह घेऊन गेले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन आपल्याला ही गद्दारांना धडा शिकवायचा आहे, असे ठाकरे म्हणाले.
लाच देऊन मत मागायला लाज वाटली पाहिजे
गद्दार आणि सत्ता हस्तगत केल्यापासून कंत्राटे वाटत आहेत. रेवड्या उडवत आहेत. जनतेची लुटालुट सुरू आहे. विधानसभा निवडणूक समोर आलेली असताना तुम्हाला बहिणी लाडक्या झाल्या. त्यांना लाच देऊन तुम्ही मते मागत आहात. असे कृत्य करायला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. लोकशाहीच्या रक्षणाची लढाई ही एकट्या शिवसेनेची लढाई नाही. उद्या गद्दार आमदारांना अपात्र ठरविले तरीही त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा आहेच. अशाप्रकारे लोकशाहीचा खून करणारे आपल्यावर राज्य करत असतील तर आम्ही न्याय कोणाकडे मागावा? म्हणूनच आम्ही जनतेकडे न्याय मागत आहोत, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
