Thursday, September 24, 2026
Latest NewsPUNE

संशोधन व अध्यापन यांची एकत्रित वाटचाल गरजेची – डॉ गंगाधर शिरुडे

पुणे : “उच्च शिक्षण क्षेत्रात संशोधन व अध्यापन यांची एकत्रित वाटचाल गरजेची असून प्राध्यापकांना संशोधनाकडे वळवण्यासाठी केवळ प्रोत्साहने वा पदोन्नती देणे पुरेसे ठरणार नाही तर त्यांच्यात संधोधनाप्रती आवड निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत असे मत कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे उपाध्यक्ष व श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (एसबीयुपी) या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ गंगाधर शिरुडे यांनी व्यक्त केले. नुकतेच श्री बालाजी विद्यापीठ, पुणे येथे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या (सीआयपीयु) गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एसबीयूपीचे कुलपती प्रो. बी. परमानंदन, सीआयपीयुचे महासंचालक आर. कार्तिक, सीआयपीयुच्या राष्ट्रीय समितीचे मुख्य समन्वयक डॉ. संदीप संचेती व भारतातील विविध खासगी विद्यापीठांचे कुलगुरू, प्र – कुलगुरू, संचालक व उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते.

डॉ. शिरुडे म्हणाले, “दर पाच वर्षांनी विद्यापीठातील प्राध्यापकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या योगदानाचे मूल्यमापन करत असताना त्यांनी लिहिलेली पुस्तके किंवा अहवाल यांच्या पुढे जावून त्यांनी शिकवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशा किती नाविन्यपूर्ण कल्पना विकसित केल्या यांचा देखील विचार व्हायला हवा. अन्यथा, संशोधन हे एकांगी राहील ते अध्यापनाला पूरक नसेल. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा भविष्यातील उद्दिष्टांना अनुरूप अशा कल्पना राबवून त्यांच्यातील सुप्त क्षमतेला जागवून समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

दिवसभर चाललेल्या या चर्चेत शैक्षणिक क्षेत्रातील संशोधन कार्याचे विविध पैलू जसे की विचार नेतृत्व अहवाल, मूल्यमापनाची पद्धत, कृत्रिम बुद्धीमतेला मदतीचे साधन म्हणून स्वीकारणे, शोधनिबंध, तंत्रज्ञानाची भूमिका इत्यादींवर चर्चा करण्यात आली. तसेच, यावेळी ऐल्सेव्हीअर – ईपसोसच्या भारतातील उच्च शिक्षणाविषयीच्या अहवालाचे सादरीकरण देखील करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रो. बी. परमानंदन म्हणाले, “आज सर्व काही वेगाने बदलत आहे. आपण या बदलांचा स्वीकार करत कालानुरूप आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करायला हवीत. आपण कोणत्या प्रकारचे साहित्य निर्माण करत आहोत याकडे आपले लक्ष असायला हवे. संशोधन करताना देशाची गरज ओळखून ते करायला हवे. देशासाठी उपयुक्त संशोधन करताना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्यासारख्या खासगी विद्यापीठांना देशासाठी उपयुक्त संशोधन करण्याच्या संधी आहेत. आपण आपापल्या विद्यापीठातील प्राध्यापकांना देशाशी संबंधित शोध निबंध आणि संशोधन करण्यास प्रोत्साहित करायला हवे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading