Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

चातुर्मासानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ‘प्रवचन, कीर्तन महोत्सव’

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे प्रवचन, तर ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे, संजय महाराज पाचपोर, चंद्रकांत महाराज वांजळे यांसह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार सहभागी होणार आहेत. दिनांक २७ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दररोज सायंकाळी ५.३० नंतर हे कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

चातुर्मासानिमित्ताने दिनांक २७ जुलै ते २ आॅगस्ट रोजी दररोज सायंकाळी ६ वाजता प्रवचन होणार आहेत. श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे दररोज प्रवचन होईल. प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

दिनांक ३ ते ९ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. त्यामध्ये शनिवारपासून (दि. ३ आॅगस्ट) अनुक्रमे परळी वैजनाथ येथील ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, परभणी मानवत चे ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, मराठवाडयातील विदर्भ रथ ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन, कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading