UPSC चे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा
नवी दिल्ली: वादग्रस्त आयएएस प्रकरणी खुद्द केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता वादाच्या भोवऱ्यात सापडली असताना आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर प्रकरणात सोनी यांचा काही संबंध नसून व्यक्तिगत कारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला अथवा नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
वास्तविक सोनी यांनी जून महिन्याच्या अखेरीलाच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील स्वामीनारायण संप्रदायाच्या अनुपम मिशन या संस्थेसाठी पूर्ण वेळ काम करण्याचा सोनी यांचा मानस आहे. सन 2020 मध्ये स्वामीनारायण संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर ते कर्मयोगी संन्यस्त बनले आहेत. या कामासाठी अधिक वेळ देता यावा म्हणूनच सोनी यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
सोनी यांची सन 2017 मध्ये लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 16 मे 2023 मध्ये त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2019 मध्ये संपणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला.
सोनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्ती आहेत असे मानले जाते. सर्वात कमी वयात कुलगुरू पद मिळवण्याची संधी सोनी यांना प्राप्त झाली. वयाच्या केवळ 40 व्या वर्षी सन 2005 मध्ये ते एमएस वडोदरा विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतरही त्यांनी गुजरात मधील दोन विद्यापीठात कुलगुरू पदाची जबाबदारी पार पाडली.
मोदींशी जवळीक असल्याने विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य
सोनी यांची मोदी यांच्याशी जवळीक असल्याने ते विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले. सोनी यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती संविधानविरोधी असल्याची टीका काँग्रेस नेते व विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. तसेच सोनी यांच्या नियुक्तीमुळे लोकसेवा आयोग आता केंद्रीय प्रचारक संघ आयोग बनेल, असेही ते म्हणाले होते.
