Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

….. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका – रावसाहेब दानवे

मुंबई: महाविकास आघाडीचे आमदार सभागृहात बोलताना शासकीय योजनांवर टीका करतात आणि आपल्या मतदारसंघात मात्र या योजनांची माहिती देणारे होर्डिंग लावतात. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे, असा शब्दात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. 

महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला, युवक, शेतकरी अशा अनेक समाज घटकांसाठी कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. अनेक विकासकामांचा उल्लेख आहे. महाविकास आघाडीचे नेते आपल्या मतदारसंघात या योजनांचे होर्डिंग लावतात आणि सभागृहात मात्र त्यावर टीका करतात, असे रावसाहेब दानवे म्हणाले. 

महाविकास आघाडीत काहीही आलबेल नाही

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सकाळी उठून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगतात. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना शांत करतात. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि भावी मुख्यमंत्री नाना पटोले गळ्यात रुमाल अडकवून आणखी काही वेगळेच बोलतात. सांगली लोकसभा मतदारसंघावरून किती वादविवाद झाले ते सगळ्यांनी बघितले आहेत. अखेर या मतदारसंघात काँग्रेसने बंडखोरी केली. यांच्यावर जनतेने विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत काहीही आलबेल नाही, अशा शब्दात दानवे यांनी महाविकास आघाडीला शालजोडीतून टोले लगावले.

मित्रपक्षांसोबत चर्चा करून ठरवणार जागावाटपाचे सूत्र

विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आम्हाला राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व 288 मतदारसंघांचा अभ्यास केला आहे. निवडणुकीतील जागा वाटपाबाबत मित्रपक्षांशी चर्चा करून जागा वाटपाबाबत सूत्र निश्चित करण्यात येईल. तसेच कोणी कुठली जागा लढवायची याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असेही दानवे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करणारा पक्ष आहे, असा दावाही त्यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading