‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य
पुणे : श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपतीला तब्बल १५१ किलो मोतीचूराचा भव्य मोदकाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. जालना येथील दहिवाळआणि शहाणे परिवारातर्फे हा मोदक अर्पण करण्यात आला असून तो तीन दिवसात साकारण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षी उत्सव मंडपात हा भव्य मोदक टेम्पोतून आणण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील परतुर येथील एकनाथराव दहिवाळ यांच्यातर्फे दगडूशेठ गणपतीला हा १५० किलो मोदक सुजाता एकनाथराव दहिवाळ व अमोल रंगनाथराव शहाणे, दिपाली अमोल शहाणे, साक्षी रोहित शहाणे, माहेश्वरी मायरा यांच्यातर्फे अर्पण करण्यात आला. मोतीचूर लाडू, तूप, साखर, ड्रायफ्रुट, केशर असे यामध्ये वापरण्यात आले आहे. सलग तीन दिवस तब्बल ६ कारागिरांच्या मदतीने हा मोदक तयार केला.
साक्षी रोहित शहाणे, अमोल शहाणे आणि शहाणे परिवारातर्फे दगडूशेठ गणपतीला नवस करण्यात आला होता. तो पूर्ण झाल्यानंतर या परिवाराने बाप्पाला हा नैवेद्य अर्पण केला. नैवेद्य दाखविल्यानंतर प्रसाद म्हणून गणेशभक्तांना याचे वाटप करण्यात आले.
