Thursday, September 24, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तंजावरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन उत्साहात.

 

तंजावर  : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या तामिळनाडूतील साहित्य संमेलनाचे उद्घाटन तंजावर येथील पेथनन कलैयरंगम हॉलमध्ये, जगप्रसिद्ध बृहदीश्वर मंदिराजवळ उत्साहात झाले. महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील साहित्य, संस्कृती व इतिहासाचा संगम घडविणाऱ्या या संमेलनाला साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमींची उपस्थिती लाभली.

ज्ञानेश्वर पतंगे, राष्ट्रीय विश्वस्त, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद यांच्या शुभहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद गोरे, तर उद्घाटक म्हणून तंजावर संस्थानचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले उपस्थित होते. माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी स्वागताध्यक्षपदाची भूमिका बजावली. तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तथा तंजावर संस्थानचे श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले हे संमेलनाचे निमंत्रक होते.

यावेळी केरळ प्रदेशाध्यक्ष डॉ. अश्विनी भगत, पल्लवी गोरे, बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, गुजरात प्रदेश उपाध्यक्ष रंजनादेवी भोइटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, आप्पासाहेब गुरव, विकास भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

*साहित्य संमेलने देशभर व्हावीत : डॉ. गोरे*

डॉ. शरद गोरे म्हणाले, “साहित्य संमेलने भारताच्या कानाकोपऱ्यात झाली पाहिजेत. तंजावर येथे झालेले हे साहित्य संमेलन सर्वांचे यश आहे. विविध राज्यांतील साहित्यिक, कवी, लेखक व संशोधकांनी एकत्र येऊन अशा प्रकारची संमेलने घेण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.” मराठी साहित्याचा विस्तार विविध राज्यांमध्ये करण्याचे आवाहन त्यांनी केले.

*मराठी-तमिळ भाषिकांचा सांस्कृतिक संगम*

युवराज संभाजीराजे भोसले म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही चांगली संकल्पना आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांचा साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून संगम होत आहे. मराठी भाषा तामिळनाडूमधील सर्वांना समजत नाही आणि तमिळ भाषा महाराष्ट्रातील लोकांना समजत नाही, हा भाषेचा फरक असला तरी येथील नागरिक मायाळू असून आपलेपणाने समजून घेतात. भविष्यात सर्वांनी एकत्र येऊन साहित्य परिषद अधिक बळकट करू, असे त्यांनी सांगितले.

*मराठी-तमिळ संस्कृती जोडण्याचे काम*

छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले, मराठी आणि तमिळ संस्कृतीचा संगम घडविण्याचे काम या संमेलनातून होत आहे. माणसांना जोडण्यासाठी साहित्याची भूमिका महत्त्वाची आहे. तंजावर येथे आलेल्या सर्व साहित्यिक, लेखक आणि कवींचे त्यांनी मनःपूर्वक स्वागत व आभार मानले.

*मराठी-तमिळी जुळ्या बहिणी : ढोबळे*
प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, तंजावरच्या भूमीत छत्रपती राजांनी मराठी साहित्य परिषदेच्या कार्यासाठी सावली दिली आहे. या कार्याचे यश अबाधित ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. कवयित्री बहिणाबाई यांच्या साहित्याचा उल्लेख करत त्यांनी कविता ही जीवनाचे भाष्य करणारी असल्याचे सांगितले. कवीचे साहित्य समजून घेण्यासाठी कवीशी मैत्री असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती सरफोजीराजे यांनी तामिळनाडूमध्ये केलेल्या कार्याचा उल्लेख करून, मराठी आणि तमिळ या जुळ्या बहिणी असल्याचे ढोबळे यांनी नमूद केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न उशिरा झाले असले, तरी आता साहित्य क्षेत्रात सातत्याने काम करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून विविध राजे आणि मावळ्यांनी राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्याराज्यांतील चांगले संदर्भ आत्मसात करावेत आणि त्यातून व्यापक साहित्य संमेलने घडवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

*पुस्तकांचे प्रकाशन*

संमेलनादरम्यान विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कवी सूर्यकांत नामुगडे लिखित “सावल्या” आणि लेखक माणिक कदम यांच्या ‘पर्यावरणाची परिक्रमा’ या पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. महाराष्ट्राबाहेर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पोहोचविण्यासह विविध भाषिक आणि सांस्कृतिक घटकांना साहित्याच्या माध्यमातून जोडण्याचा संदेश या संमेलनातून देण्यात आला. तसेच मराठीचा वैश्विक सत्रावर जागर आणि अनुबंध या विषयावर परिसंवाद आणि निमंत्रित कवींचे कविसंमेलन हे उत्साहात पार पडले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे सूत्रसंचालन विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी केले. अमोल कुंभार यांनी आभार व्यक्त केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading