केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो – डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन: अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामात कार्यरत झाले आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा एक विचित्र अनुभव होता. त्यातून केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली.
पेन्सिलवानिया या ठिकाणी प्रचार मोहिमेदरम्यान अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थॉमस मॅथ्यू कृक्स या वीस वर्षीय युवकाने गोळीबार केला. या गोळीबारात सभेतील एक प्रेक्षक दगावला तर दोन जण जखमी झाले. ट्रम्प यांच्या दिशेने झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेल्यामुळे ते बचावले. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी जागीच ठार केले.
या घटनेनंतर कानाला पट्टी बांधून डोनाल्ड राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित झाले. या अधिवेशनात ट्रम्प यांच्या उमेदवारीची घोषणा केली जाणार आहे.
आपल्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, हा हल्ला म्हणजे एक विचित्र अनुभव होता. जणू माझे मरण निश्चित करण्यात आले होते. मात्र, केवळ नशिबाने अथवा देवाच्या दयेने मी या हल्ल्यातून वाचलो. बंदुकीतून गोळी माझ्या दिशेने येत असताना मी नकळतपणे मानेची जी काही हालचाल केली त्यामुळे जीवावर आलेले कानावर निभावले. अन्यथा त्या गोळीने निश्चितपणे माझा प्राण घेतला असता.
