वाहन फिटनेस सर्टिफिकेट वरील दंड रद्द करून रिक्षा चालकांना दिलासा द्या – आमदार सिद्धार्थ शिरोळे
मुंबई : रिक्षाचालकांना दरवर्षी वाहन फिटनेस सर्टिफिकेट चे नूतनीकरण करून घेणे अनिवार्य असते. मात्र, नूतनीकरण वेळेत झाले नाही तर रिक्षाचालकांकडून प्रतिदिन ५० रुपये दंड आकारला जातो. ही दंडाची रक्कम वाढत जाते. हा दंड रिक्षा चालकांना परवडणारा नसल्याने रद्द करा आणि त्यांना दिलासा द्या, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिक्षाचालकांचे आंदोलन सुरु आहे.नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्टिफिकेट असणे हे गरजेचे आहे. नूतनीकरण वेळेत झाले नाही तर रिक्षाचालकांकडून प्रतिदिन दंड आकारला जातो. कालांतराने दंडाची रक्कम भरणे अशक्य होते. त्यामुळे सर्टिफिकेट चे नूतनीकरण काही कारणाने लांबत जाते, हे लक्षात घेऊन दंडच रद्द करावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.
आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, रिक्षाचालकांचा घराचा खर्च, रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड, मुलांचे शिक्षण, आरोग्य अशा अनेक बाबींवर खर्च करत तो कष्टाने संसार चालवत असतो. अशा स्थितीत फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणाचा दंड हा मोठा भार होतो. त्या दंडातून मुक्तता करून रिक्षा चालकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
