Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

General Election results : पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा, देशाला म्हटले ‘सॉरी’

लंडन (वृत्तसंस्था ) : ब्रिटनमध्ये तब्बल 14 वर्षानंतर सत्तांतर होत असून सत्तारूढ हुजूर पक्षाचा पराभव करून मजूर पक्षाने 412 पेक्षा अधिक जागा जिंकत सत्तेकडे घोडदौड चालू केली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडून भारतीय वंशाच्या नागरिकांचा झालेला अपेक्षाभंग हुजूर पक्षाला भोवला असून त्यांच्या पराभवाचे हे देखील प्रमुख कारण ठरले आहे. ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि देशाला ‘सॉरी’ म्हटले आहे. 

ब्रिटनमध्ये तब्बल 18 लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत. ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांच्या त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ते आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत, अशी भावना बहुसंख्य भारतीय वंशाच्या मतदारांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मतांपैकी तब्बल 65 टक्क्यांहून अधिक मते हुजूर पक्षाच्या विरोधात गेल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. हे त्यांच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण आहे.

मतदारांच्या नाराजीची कारणे 

एकीकडे महागाईने कळस गाठलेला असतानाच वारंवार करांमध्ये वाढ करू सरकारने नागरिकांच्या खिशाला कात्री लावली. त्यामुळे मतदारांच्या संतापात भर पडली. विदेशी नागरिकांची घुसखोरी ही ब्रिटनसमोर मोठे संकट बनले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने अथवा शरणार्थी म्हणून मोठ्या प्रमाणावर विदेशी नागरिक जलमार्गाने ब्रिटनमध्ये प्रवेश करीत आहेत. आपल्या जल सीमा सुरक्षित करून या घुसखोरीला आळा घालण्यास सरकारला अपयश आल्याची मतदारांची भावना आहे. त्याचप्रमाणे एकूणच कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सरकार अपयशी ठरले.

 युरोपीय संघ सोडणे पडले महागात 

युरोपीय संघात ब्रिटनची गळचेपी होत असल्याच्या कारणावरून ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अंगाशी आल्याचे आता दिसून येत आहे. सदस्य राष्ट्रांवर आग पाखर करून आणि स्वदेशातील जनतेला जनमताची साद घालून युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला आहे. युरोपीय संघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन मध्ये होणारी विदेशी गुंतवणूक ठप्प झाली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका देशाला बसला आहे. अशा अनेक कारणांमुळे मतदारांनी तब्बल 14 वर्षानंतर हुजूर पक्षाला डावलून मजूर पक्षाच्या हाती सत्तेची धुरा सोपविली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading